महाराष्ट्रातील नामवंत कवींची हजेरी, तसेच कवितेसाठी योगदान देणाऱ्या मान्यवराचा सत्कार यामुळे गाजलेल्या ‘वाटा कवितेच्या’ कार्यक्रमात यंदाही राज्यातील मान्यवर कवी हजेरी लावत आहेत. प्रसिद्ध समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना यंदा शब्द सह्याद्री साहित्य सन्मान जाहीर झाला आहे.
मकरसंक्रांती दिनी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते डॉ. रसाळ यांचा गौरव होणार आहे. डॉ. रसाळ यांनी मराठी कवितेची समीक्षा केली. काव्य क्षेत्रात मोठे योगदान दिले, त्याबद्दल हा गौरव होत आहे. ११ हजार रुपये, मानपत्र, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप आहे. यापूर्वी रोहित नागभिडे, रंगनाथ खेडेकर, दगडू लोमटे, प्रा. श्रीधर भोंबे, ‘कवितारती’चे संस्थापक संपादक प्रा. पुरूषोत्तम पाटील आदींना गौरविण्यात आले. सत्कार सोहळ्यानंतर होणाऱ्या कवी संमेलनास प्रभा गणोरकर (अमरावती), श्रीकांत देशमुख (नांदेड), विरधवल परब (सिंधुदुर्ग), लता ऐवळे (पुणे), भरत दौंडकर (शिरूर), पी. विठ्ठल (नांदेड) यांच्यासह नामवंत कवींची उपस्थिती असेल. संमेलनाला रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन इंद्रजित भालेराव, आसाराम लोमटे, भारत काळे, आनंद देशपांडे, केशव खटींग, दिलीप श्रृंगारपुतळे, भगवान काळे, कल्याण कदम, बबन आव्हाड, विठ्ठल भुसारे, अरुण चव्हाळ आदींनी केले आहे.