आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अॅण्ड लिटरेचर या संस्थेच्या वतीने सीताबर्डी येथील मोरभवनात आयोजित कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे नागपूरच्या सांस्कृतिक चळवळीतील हे अविस्मरणीय कविसंमेलन ठरले.
प्रत्येक कवीने आपापला काव्यप्रवास कथन करून सामाजिक आशयाच्या विचार संपन्न कविता सादर केल्या. सर्वच कवींच्या कवितेला अनुभवाची, वैचारिक चिंतनशीलतेची, प्रतिभेची आणि बुद्ध, फुले, आंबेडकरी निष्ठेची झालर होती. कवितांचे उत्कृष्ट सादरीकरण आणि बहारदार सूत्रसंचालनामुळे उपस्थित रसिकांच्या मनावर हे कविसंमेलन कायम कोरले गेले. या कविसंमेलनाची भूमिका ज्येष्ठ नाटककार दादाकांत धनविजय यांनी स्पष्ट केली. कविसंमेलनात डॉ. प्रकाश खरात, इ.मो. नारनवरे, केतन पिंपळापुरे, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, गोविंद वाघमारे, उल्हास मनोहर, महेंद्र गायकवाड, किरण मेश्राम यांनी उत्कृष्ट कविता सादर केल्या. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन नाटय़ कलावंत पल्लवी जीवनतारे यांनी केले. आभार सामाजिक कार्यकर्ते राजन वाघमारे यांनी केले. ‘दलित कवितेचे रणकंदन’ कविसंमेलनाला ताराचंद्र खांडेकर, भूपेश थुलकर, यशवंत निकोसे, लटारी कवडू मडावी, दुर्वास चौधरी, शिवचरण थुल, प्रकाश बनसोड,
प्रा. रमेश शंभरकर, डॉ. संजीव मेश्राम, डॉ. सुरेश वर्धे, डॉ. सविता कांबळे, सुदेश भोवते आदी उपस्थित होते.