अनुभवाच्या जाणतेपणातूनच कवितेची निर्मिती होत असते. कवी होण्यासाठी ती व्यक्ती मातृहृदयी असावी लागते, प्रसववेदना सहन केल्यावरच मातृत्वाची अनुभूती घेता येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरद कळणावत यांनी येथे केले.
मुंबईच्या कवियत्री प्रज्ञा अनंत जोशी यांच्या ‘अंतर्नाद‘ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी डॉ.कळणावत बोलत होते. कांतानंद भवनात पत्रकार न.मा.जोशी यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अत्यंत भावपूर्ण आणि थाटात संपन्न झाले. ‘अंतर्नाद‘ मधील विविध विषयांवरील ५० कवितांचा आढावा घेत डॉ. शैलजा रानडे यांनी या काव्यावर भाष्य केले. एका स्त्री मनाचे भावविश्व या काव्यसंग्रहातून प्रगट होते, असे सांगून डॉ. रानडे म्हणाल्या की, शब्दाचे प्रवाहीपण आणि अर्थाची घनता यांचा सुंदर मिलाप ही कवितेची वैशिष्टय़े असतात. प्रज्ञा जोशी यांच्या काव्यातील बलस्थाने आणि सौंदर्य स्थळे अतिशय प्रभावीपणे उलगडून दाखवली.
अध्यक्ष म्हणून बोलतांना न.मा.जोशी म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीत एक अव्यक्त कवी लपलेला असतो. आपल्या अभिव्यक्तीचे प्रगटीकरण जो लिखाणाच्या स्वरूपात करतो तो कवी होतो आणि जो अव्यक्त राहतो तो रसिक होतो. प्रज्ञा जोशी यांच्या काव्याची सहजता आणि साधेपणा ही वैशिष्टय़े आहेत. काव्यातून आनंदाचे देणे झाले पाहिजे, वाचकांना कवीने आनंद दिला पाहिजे.  प्रकाशन संजय महल्ले व अक्षर जुळवणी करणारे प्रकाश जोगावार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अंकुर साहित्य संघ, महिला कला साहित्य संघ इत्यादी संस्थांच्या वतीने विद्या खडसे, डॉ. ज्योती लाडखेडकर, सुधा सहस्रबुध्दे, प्रमिला उमरेडकर, शुभदा मुंजे, डॉ. सुहास श्रोत्री, शरद पिदडी, गजेश तोंडरे, विनोद देशपांडे, चंद्रकांत काने, व. वी.बक्षी इत्यादींनी प्रज्ञा जोशी यांचा मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.