तब्बल तीन तास रंगलेल्या संमेलनात ५५ पेक्षा अधिक कवींनी काव्यसरींची बरसात करून येथील मथुराई अध्यापक विद्यालयाच्या सभागृहात उपस्थित रसिकांना चिंब भिजविले. प्रत्येकाच्या कवितांना रसिकांनी मनमोकळेपणे दाद दिल्याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला.
अंकुर साहित्य संघाच्या जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने चाळीसगाव येथे या खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या पहिल्या सत्रात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी योगाचार्य, साहित्यिक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव वसंतराव चंद्रात्रे हे होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून मथुराई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुधीर पाटील, त्रमासिक ‘तिफण’चे संपादक प्रा. शिवाजी हुसे, साहित्यिक प्रा. बी. एस. पाटील, अंकुरच्या जिल्हाध्यक्षा प्रा. साधना निकम, सचिव प्रा. पी. एस. चव्हाण, अंकुरचे पाचोरा तालुकाध्यक्ष व विवेकानंद पाटील अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य शेलार व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. साधना निकम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. पी. एस. चव्हाण यांनी करून दिला.
याप्रसंगी विविध पुरस्कारप्राप्त कवी, लेखकांचा गौरव करण्यात आला. त्यात दिनेश चव्हाण, मंगला कुमावत, सुनील गायकवाड, मनोहर आंधळे, गो. शि. म्हसकर, रमेश पोतदार, धुळे येथील पत्रकार भगवान जगताप, विलास देव यांचा समावेश होता. प्रथम सत्राचे सूत्रसंचालन अंकुरच्या जिल्हा उपाध्यक्षा भाग्यश्री देशपांडे यांनी केले. जी. एन. ठगे यांनी आभार मानले.
दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन करताना सुनील गायकवाड यांनी आपल्या खास शैलीने उपस्थितांना खूश केले. संमेलनात आरती पूर्णपात्रे यांची ‘ओनरशिप’, सचिन ठाकरे यांची ‘शेतकरी’, राकेश खैरनार ‘नाती’ आणि विश्वास पाडोळसे यांच्या ‘लोकशाही’ या कवितेने छान सुरुवात झाली. प्रियंका महाले ‘माझी सोनुली’, सोनाली गायकवाड ‘दुष्काळ’, तर प्रा. शिवाजी हुसे यांची ‘सांगना गं आई’, राम जाधव ‘मुके घाव’ या कवितांनी रसिकांना विचार करण्यास प्रवृत्त केले. नवोदित कवींच्या सामाजिक बांधीलकीने रसिकही चकित झाले.