शिरवाडे वणी येथील कविवर्य कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालयात आयोजित कवयित्री तथा प्राचार्या मानसी देशमुख यांच्या ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ या काव्यात्मक कार्यक्रमाने उपस्थितांना चांगलेच विचारप्रवृत्त केले. स्त्रियांच्या स्थितीवर कधी भेदक, कधी अंतर्मुख करणारे तर कधी हास्यात्मक भाष्य करणारे त्यांचे काव्य सर्वाच्याच अंत:करणाचा ठाव घेऊन गेले. ‘संवाद मायलेकीचा’ या कवितेत मातेच्या उदरातील तीन महिन्याचा स्त्री गर्भ आईच्या स्थितीचे कसे वर्णन करतो व त्याची हत्या झाल्यानंतर त्याची माता काय करते याचे चित्रण आहे. ही कविता सादर होत असताना रसिकांचे डोळे पाणावले. स्त्री-भ्रूणाची हत्या झाल्यानंतर माता म्हणते-
नको विचारूस मला
झाली कशासाठी मीरा
खून टाळण्या दुसरीचा
प्याला विषाचा घेतला
‘मुलीच्या जातीचे असेच असते’ ही कविता इतकी रंगली की रसिक कडवे संपताच तिचे धृपद म्हणायला लागले-
सतत खेळणाऱ्या भावाला
अभ्यास करावा म्हणून
आई चार रट्टे चढवते
अन् माझ्या हातातील
पुस्तक हिसकावून
मला घरकामाला
जुंपते वरून म्हणते
बाई
मुलीच्या जातीचे असेच असते
‘कशाला’ या कवितेतून आजच्या सामाजिक वास्तवावर त्यांनी केलेले दाहक भाष्य सर्वाना सुन्न करून गेले-
अहो सावित्रीबाई
अन् महर्षी कर्वे
कशासाठी केलात
आमच्याकरिता
घराचा उंबरा खुला
कशासाठी मुक्त केलीत
कर्तृत्वाची सारी क्षितिजे,
त्याआधी
माजघर, शेजघर आणि
बाळंतपणाची अंधारी खोली,
हेच विश्व होतं आमचं
बाहेरच्या श्वापदांना
दिसत नव्हतं
कधी नखही आमचं
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लेकीची दाहक कहाणी त्यांनी ‘भाग्यवंत’ या कवितेतून सादर केली. कर्ज काढून केलेली मशागत पावसानं दडी दिल्यामुळे वाया गेली. बायकोचे गहाण ठेवलेले दागिने सोडविता आले नाही. कर्ज फेडायची चिंता असह्य झाल्यामुळे अनंत चतुर्दशीला जीव देणारा आपला बाप काय म्हणाला, हे सांगताना कवितेतील नायिका म्हणते-
बुडवा गणपती संगे
माझ्यासह या कर्जाला
रडू नका मेलो तरी
लाख मिळती तुम्हाला
पोसू नाही शकलो मी
जेव्हा होतो मी जिवंत
जीव देऊनिया तुम्हा केले
लखपती भाग्यवंत
चिठ्ठी लिहुनिया बाप
जीव देऊनिया गेला
तुकडा पाच एकराचा
कब्रस्थान भासे मला