11 December 2019

News Flash

चिंतनातूनच कवितेचा जन्म -लक्ष्मण महाडिक

वसंत व्याख्यानमाला जीवनात येणारे अनेक अनुभव हृदयाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त होतात. कधी शब्दांचा तर कधी आठवणींचा हात धरत ते मूर्त रूप घेतात. त्या चिंतनातूनच कविता रूप

| May 22, 2013 08:53 am

वसंत व्याख्यानमाला
जीवनात येणारे अनेक अनुभव हृदयाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त होतात. कधी शब्दांचा तर कधी आठवणींचा हात धरत ते मूर्त रूप घेतात. त्या चिंतनातूनच कविता रूप घेते. कवितेच्या निर्मितीचा आनंद असला तरी ते सहज शक्य होत नाही, असे प्रतिपादन कवी लक्ष्मण महाडिक यांनी केले.
येथील यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेत ते ‘डोंगरावरची कविता’ या विषयावर बोलत होते. त्यांना तुकाराम धांडे यांनी साथ दिली. महाडिक यांनी आयुष्य जगताना अनुभवांची शिदोरी आपसूक जमा होण्यास सुरुवात होते, असे नमूद केले. जमलेल्या या शिदोरीला शब्दांची साथ मिळाली की, ती साहित्याच्या स्वरूपात मूर्त रूप घेते. कवितेचे रूप घेऊन अनेक भावना साकारतात. आजवर शब्दांची साधना केल्याने अनेक माणसे नकळत जोडली गेल्याचेही त्यांनी सांगितले. धांडे यांनी आपले आयुष्य डोंगर, दऱ्या-खोऱ्यांत गेल्याने डोंगरावर अधिक कविता लिहिल्या असल्याचे नमूद केले.
‘तुकोबा आणि आजोबा’ ही कविताही त्यांनी सादर केली. संत तुकाराम महाराजांनी अभंगांच्या रूपाने कविताच लिहिल्या आहेत. त्यात भावना मांडण्याचा मी प्रयत्न करतो, असे ते म्हणाले. ‘पहिला पाऊस झेलशील तेव्हा, चिंब पावसात भिजून घे, ॠतू सतत बदलत राहतात, मातीत चांगले रुजून घे’ या कवितेद्वारे महाडिक यांनी निसर्गाशी असणारी जवळीक जपण्याचा सल्ला दिला.
 ‘शेणा मातीत आयुष्य घालविताना, मातीतच जन्माचे सार्थक झाले’ आणि ‘तळहातावरच्या जखमा कागदावर पुसता पुसता मीच कवितेचा बाप झालो’ यांसह आजी व नातीशी साधलेला संवादही महाडिक यांनी आपल्या खास शैलीत सादर केला.
‘पोर डोंगरावर भाळली’ या कवितेतून रानावनात आयुष्य गेलेली मुलगी लग्न करून शहरात जाते. नंतर माहेरी परतताना दूरवरून दिसणारे डोंगर पाहताना तिच्या मनाची होणारी उलथापालथ टिपण्याचा प्रयत्न या कवितेत केला असल्याचे धांडे यांनी सांगितले. महाडिक व धांडे यांनी आपल्या विविध कवितेतून ग्रामीण जीवनाचा प्रत्यय उपस्थितांना दिला.

First Published on May 22, 2013 8:53 am

Web Title: poetic birth through meditation laxman mahadik
टॅग Meditation
Just Now!
X