मनातल्या अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी कवितेसारखे दुसरे साधनच नाही असे कुमारी रमिजा जमादार हिने पहिल्या विद्यार्थी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदावरून सांगितले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या सहयोगाने मिरज पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून मिरजेतील बालगंधर्व नाटय़गृहात पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान भुदरगड येथील नववीतील विद्यार्थिनी रमिजा जमादार हिला मिळाला होता. साहित्य संमेलनाचा प्रारंभ बेडगेच्या सानप वस्तीवरील जि.प. शाळेतील मुलामुलींच्या सामूहिक गीताने झाला. या मुलांनी ‘गोल गोल पाऊस पडतोय रे, माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे’ या गीताने संमेलनाची सुरुवात झाली. या गीतावर ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी प्रेक्षागारातच नाचायला सुरुवात करताच जमलेल्या बालचमूने टाळय़ांचा ठेका धरला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कुमारी जमादार हिने सांगितले, की माझे भाषण म्हणजे पाण्याच्या नळाने सागराला पाण्याचे महत्त्व सांगण्यासारखे आहे. धार्मिक कारणावरून होणारा संघर्ष आमच्या बालमनावर ओरखडे पाडणारा आहे. माणूस म्हणून ज्या वेळी सर्वजण एकत्र येतील तोच आमच्या दृष्टीने सुदिन असेल. निसर्ग हाच गुरू असून त्याचा संवाद ऐकण्याची सवय बालपणापासूनच अवगत झाली. त्यामुळेच मी काव्यलेखनाकडे वळले. तिने या वेळी माझ्या मामाचा गाव, मुंगी या दोन कविता सादर केल्या.
या वेळी प्रारंभी गटशिक्षण अधिकारी नामदेव माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कविवर्य विठ्ठल वाघ यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले, की मनातला काळोख दूर करण्यासाठी लेखनीची मेणबत्ती लावावी लागते. करुणा, दया, प्रेम, माणुसकी या उदात्त भावनांची निर्मिती करण्याचे कार्य केवळ साहित्यच करू शकते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास गोिवद पाटील, गोिवद गोडबोले आदी उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात सुमरण जमादार (डिग्रज), रोहित पाटील (काकडवाडी), वेदान्त शहा (आरग) या बालकथाकारांनी आपल्या कथा सादर केल्या. त्यानंतर बिसूरची गायत्री पाटील या सातवीत शिकणाऱ्या कवयित्रीच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. यामध्ये बिसूर, बामणोली, सावळी, आरग, बेडग, डोंगरवाडी टाकळी, दुधगाव, मालगाव, सिद्धेवाडी, पाटगाव, सोनी, मल्लेवाडी, करोली, सुभाषनगर आदि जिल्हा परिषद शाळातील ४५ बालकवींनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या.
ऐश्वर्या नागरगोजे हिने ‘माझी माय, गरीब गाय, राबून राबून थकून जाय’ ही कविता सादर केली, तर सुमित माळी याने ‘रुबाबदार खारू नको तिला मारू’ ही कविता सादर केली. कविसंमेलनाच्या अध्यक्ष गायत्री पाटील हिने ‘चंचल मन’ नावाची कविता सादर केली. तेजस चव्हाण, अजय केंचे, शिवानी चौगुले, मोनिका खाडे, दीपाली रजपूत, सोहम कांबळे, अभिषेक पारसे, योगेश यादव, साक्षी बामणे यांच्या कविता लक्षवेधी ठरल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक बिसुरे, प्रतीक्षा नरुटे, सुमित कदम या सातवीतल्या विद्यार्थ्यांनी केले. पंचायत समिती कार्यालयापासून लेजिम, ढोलाच्या तालावर कथासूर्य पानवलकरनगरापर्यंत ग्रंथिदडी काढण्यात आली.