‘दसरा-दिवाळी,सण मोठा.. नाही इथे वेदनेला तोटा’ अशी स्थिती सांगली जिल्ह्यातील कवठेएकंदमधील पारंपरिक दसरा उत्सवाची यंदाच्या स्फोटाने झाली आहे. शोभेच्या दारुसाठय़ाचा अपघाताने स्फोट होऊन रविवारी पाच जणांचा बळी गेला. केवळ परंपरा म्हणून या ठिकाणी सुरु असणारी दारुची आतषबाजी केवळ श्रद्धेपोटी की तरुणाईच्या ईष्रेपोटी, याचा विचार होणार की  नाही? श्रद्धा जपत असताना त्याला आधुनिकीकरणाची जोड देत असताना मानवी सुरक्षितता महत्त्वाची मानली जाते का?  हे सारे प्रश्न सर्वसामान्यांच्या दृष्टीने स्फोटामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
कवठेएकंदचा दसरा उत्सव परंपरेने चालत आलेला. ग्रामदैवताच्या पालखीसमोर दारुची आतषबाजी कधी श्रद्धेची, कधी परंपरेची तर कधी नवसाची ठरलेलीच आहे. दिवाळी-दसरा हे आनंददायी सण म्हणून ओळखले जातात. या आनंदाच्या क्षणी एखादे कुटुंबच उद्ध्वस्त झाले तरीही स्फोटक पदार्थाबाबत कितपत काळजी घेतली जाते हाही प्रश्नच आहे.
वडीलधारी मंडळी दारु तयार करीत असताना काळजी घेत होते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होते. पण अलिकडच्या काळात या उत्सवात तरुणाईचा मोठय़ा प्रमाणात शिरकाव झाल्याने अपेक्षित दक्षता बाळगली जाईलच याची खात्री देता येत नाही. दारु तयार करण्यासाठी स्वतंत्र आणि बंदिस्त जागेची आवश्यकता असते. त्याचबरोबर तयार झालेल्या दारुचे जतन काळजीपूर्वक करण्याची गरज आहे.
रविवारी पत्रीबाण उडाल्याने स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतो. ज्या वेळी दारु कामाचे वेगवेगळे प्रकार तयार करुन एकत्रित ठेवले जातात, ते लाकडी पेटीमध्ये बंदिस्त जागेत ठेवावेत, या साध्या नियमाची सुद्धा दखल घेतली जात नाही. उघडय़ावर दारुपासून वेगवेगळ्या प्रकारांची निर्मिती अंतिम क्षणापर्यंत सुरुच असते.
२५ हजार लोकवस्तीचे हे गाव. गावात मंदिरापासून ग्राम सचिवालयापर्यंत केवळ २० फुटी एकच रस्ता. आणि या रस्त्याच्या दुतर्फा शोभेच्या दारुची आतषबाजी रात्रभर सुरु असते. आणीबाणीचा प्रसंग उद्भवलाच तर बाहेर पडायला कोणताही मार्ग उपलब्ध नाही. गावातील विठ्ठल मंदिरापासून ग्रामसचिवालयानजिक असणाऱ्या नाल्यापर्यंत दोन्ही बाजूला एकाला लागून एक अशी घरे आहेत. आणि याच मार्गावर मोठय़ा प्रमाणात दारुची आतषबाजी सुरु असते. जर दुर्दैवाने अनुचित घटना घडलीच तर बचावाला संधी तर मिळतच नाही, मग मदत कार्याला वाट कुठली, असा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे.
शोभेची दारु तयार करण्यामध्ये प्रामुख्याने काळी आणि पांढरी हे दोन प्रकार आढळून येतात. काळी दारु कमी स्फोटक असली तरी, त्यातून नयनरम्य रोषणाई कमी प्रमाणात दिसून येते. त्यामुळे अलिकडच्या काळात पांढऱ्या दारुपासून निर्माण होणारे विविध प्रकार तयार केले जातात. यामध्ये अमोनियम ९९९-६६६, हरताळ, सुरमेट, गंधक याचा वापर केला जातो. तसेच रुईचा कोळसा, कानसी भीड याचा वापर वेगवेगळ्या प्रकारात करण्यात येतो. झाडे तयार करण्यासाठी प्रामुख्याने अॅल्युमिनियम भीडचा वापर केला जातो. हे योग्य प्रमाणात मिश्रण केले तरच शोभेची नजाकत नयनरम्य ठरु शकते. नवनवीन आयटम सादर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रमाणात हे रासायनिक पदार्थ वापरुन चाचणी घेतली जाते. ही चाचणी घेत असताना दक्षता पाळली जातेच असे नाही. अॅल्युमिनियम भीड, अमोनियम सल्फेट हे रासायनिक पदार्थ ज्वालाग्रही आणि धोकादायक तर आहेतच, पण तयार दारुवर कापूर चोळण्याचा प्रकार अधिक स्फोटक बनविण्यासाठी या ठिकाणी होत असतो.
दारु निर्मितीसाठी बहुतांश तरुण वर्गाकडे कोणतेही प्रशिक्षण घेतले असल्याचे आढळून येत नाही. स्फोटक पदार्थाची साठवणूक  हाताळणी,वाहतूक या जोखमीच्या बाबी असताना ज्या गांभीर्याने या गोष्टी व्हायला हव्यात ते गांभीर्य श्रद्धेच्या नावाखाली दिसून येत नाही. केवळ परंपरा म्हणून मासिक धर्म असणाऱ्या महिलेला गावाबाहेर सोडून येणे, शिवाशीव पाळणे याचे मात्र काटेकोर पालन होत असते. ज्या नरेंद्र दाभोलकरानी अंधश्रद्धेवर आयुष्यभर लढा दिला त्यांच्याच खुनाच्या घटनेचे प्रदर्शन करुन निषेध करणारे कार्यकत्रे सुरक्षिततेला कितपत प्राधान्य देणार हे ही महत्त्वाचे आहे.
स्फोटामुळे चार वर्षांपूर्वी कुंभार गल्लीत ६ जणांचा बळी गेला. त्यानंतर या दसऱ्याला ५ जणांचा बळी गेला. गेल्या २० वर्षांत सुमारे १५ जण स्फोटाच्या दारुमुळे बळी गेले आहेत. तरीसुद्धा तरुणाईला योग्य दिशा देण्यासाठी जाणती मंडळी पुढे येत नसल्याचे चित्र दुर्दैवाने दिसत नाही. आपटबार सारखा जीवघेणा प्रकार सुदैवाने बंद झाला आहे. हजारोंच्या संख्येने यात्रेकरु दारुची आतषबाजी पाहण्यासाठी येतात. त्यांना किती अंतरावरुन दारु पहायची याच्या सूचना प्रशासन देत नाही. आपत्कालीन स्थितीत घ्यावयाची दक्षता याचीही माहिती दिली जात नाही. हुल्लडबाजीपणा कमी असला तरी, गर्दीचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले नाही तर येथील दारुची आतषबाजी आनंददायी न ठरता वेदनादायीच ठरण्याची भीती आहे.
या वेळी होणारे ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण हा तर विषय वेगळाच मानावा लागेल. सलामीला उडविले जाणारे आऊट हजारोंच्या संख्येने असतात. एकाचवेळी ही आतषबाजी सुरु असल्याने ध्वनी प्रदूषणांची मर्यादा केव्हाच ओलांडलेली असते. याशिवाय गंधक, अमोनियमसारख्या रासायनिक पदार्थाच्या  ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात आहे. दसऱ्यानंतर  तीन चार महिने डाससुद्धा गावात जिवंत राहू शकत नाहीत, इतके हे प्रमाण भयानक आहे.
गावातील तरुणाई वेगवेगळ्या मंडळांच्या माध्यमातून दारुची आतषबाजी करीत असते. हा श्रद्धेचा भाग सोडला तर काही लोक दारु निर्मितीचा व्यावसायिकतेसाठी वापर करीत असतात. गावात परवानाधारक दारु निर्मिती करणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आहेत. मात्र दसऱ्यानंतर अगदी तुळशीविवाहपर्यंत गावात दारु उडविली जाते. तोपर्यंत ही स्फोटक दारु गावातच कुठेतरी ठेवली जाते. म्हणजे एक प्रकारे दुर्घटनेला आमंत्रणच देण्याचा हा प्रकार आहे.