सोनसाखळी चोरांनी मुंबईत उच्छाद मांडला असून नवनवीन पद्धती अवलंबून ते पोलिसांच्या नाकी नऊ आणत आहेत. परंतु पोलीसही या चोरांच्या एक पाऊल पुढे जाऊन त्यांना रोखण्यासाठी जनजागृतीच्या तसेच तपासाच्या नवनवीन पद्धती शोधून काढत आहेत. प्रादेशिक भाषांतून जनजागृती, गॅरेजची पाहणी अशा अनोख्या पद्धतीनंतर आता संशयित मोटारसायकलस्वारांची स्वाक्षरी घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
सोनसाखळी चोरी हा मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर घडणारा गुन्हा. यात झटपट पैसा मिळत असल्याने गुन्हेगार सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांकडे सहज वळतात. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. मुंबईत दररोज सरासरी चार ते पाच सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असतात. पोलिसांची गस्त वाढवूनही या चोऱ्यांना आळा बसलेला नाही.
सोनसाखळी चोरीसाठी शस्त्राचा वापर करावा लागत नाही की टोळी बनवावी लागत नाही. दोन माणसे आणि एक मोटारसायकल पुरेशी असते. शिवाय सोन्याला भाव चांगला येत असल्याने झटपट पैसा कमावण्याचा हा मार्ग गुन्हेगारांना तुलनेत सोपा वाटतो. त्यामुळे पोलीसही नवनवीन पद्धतीचा वापर करून त्यांचा बीमोड करण्याचा प्रयत्न करीत असतात, असे एका पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

चोरांची शक्कल
* सोनसाखळी चोरी अवघ्या मिनिटांच्या आत होते. मोटारसायकलीवरून येऊन महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अलगद खेचून सुसाट वेगाने पळून जाणे ही त्यांची पद्धत.
* त्यासाठी चोर आपल्या मोटारसायकलीचा इंधनाच्या पाइपचा आकार वाढवून घेतात. जेणेकरून अधिक इंधनपुरवठा होऊन मोटारसायकल सुसाट वेगाने पळू शकते.
* याशिवाय मोटारसायकलीच्या रचनेत फेरफार करून हॅण्डलचा आकार कमी केला जातो. यामुळे गर्दीतून आणि गल्ली बोळातून पटकन पळून जाता येऊ शकते.
* मोटारसायकलींचा क्रमांक विचित्र पद्धतीने लिहिला जातो. ज्यामुळे पटकन तो कुणालाही टिपून घेता येत नाही.
* सीसीटीव्ही कॅमेरे जागोजागी असल्याने मोटारसायकलीवरील दोन्ही चोर डोक्यात हेल्मेट घालतात. त्यामुळे कुणाला त्यांचे चेहरे दिसून येत नाही.

जनजागृती
सोनसाखळी चोरांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून पोलिसांनीही त्यांना रोखण्यासाठी नवनवीन तपास पद्धतीचा तसेच नवनवीन प्रतिबंधात्मक उपायांचा वापर सुरू केला आहे.
* पूर्वी जागोजागी सावधानतेचा इशारा देणारे फलक लावले जायचे. ते मराठीत असत. पण आता पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी वाहने उभी करून मेगाफोनद्वारे विविध प्रादेशिक भाषांमध्ये घोषणा देत लोकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. अगदी हिंदी, इंग्लिश, गुजराती, भोजपुरी आणि दाक्षिणात्य भाषेत घोषणा केल्या जात असल्याने लोकांना त्याचा फायदा होत आहे.
* गर्दीच्या वेळी गस्ती नाके ठरवून देण्यात आले आहेत. तेथील बंदोबस्त पाहण्यासाठी साहाय्यक पोलीस आयुक्ताला तेथे जाऊन लक्ष ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
* सोनसाखळी चोरीची घटना घडल्यानंतर सर्व संशयित आणि सराईत सोनसाखळी चोरांचे मोबाइल टॉवर लोकेशन तपासले जाते. त्यापैकी कुणी जर त्या भागात असेल तर त्याच्याकडे अधिक चौकशी करून त्याला बोलते केले जाते.
* अनेकदा सोनसाखळी चोर शहराच्या दुसऱ्या टोकात जाऊन गुन्हे करतात. त्यामुळे सोनसाखळी चोरांना पकडल्यानंतर विविध पोलीस ठाण्यात देवाणघेवाण केली जाते. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना या सोनसाखळी चोरांकडे चौकशी करून त्यांनी केलेल्या गुन्हय़ांची कबुली मिळवता येते.
* प्रत्येक गॅरेज चालकाला सूचना देऊन ठेवण्यात आली आहे. जर कुणी इंधन पाइप बदलायला किंवा हॅण्डलची साइज कमी करायला आला तर तात्काळ पोलिसांना कळविण्याबद्दल ताकीद देण्यात आली आहे.
* नाकाबंदीच्या वेळी कुणाच्या नंबर प्लेट फॅन्सी असतील त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते.
* अनेकांचे मोबाइल क्रमांक टिपून ते खरे आहेत का त्याची शहानिशा लगेच केली जाते. शिवाय त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. त्या स्वाक्षऱ्यांमुळे मोटारसायकलीचा मालक तोच आहे का, ते तपासले जाते. शिवाय वरिष्ठ अधिकारी या स्वाक्षऱ्या आणि तपासणी नोंदीचा अहवाल द्यावा लागतो.