नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात तब्बल चार लाखाहून अधिक किंमतीची बनावट दारू नाशिकच्या उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने हस्तगत केली आहे. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे, औरंगाबाद येथील एका बंद कारखान्याच्या नांवाने संशयित ही बनावट दारू तयार करत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावर देवळा तालुक्यातील एका हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी साडे पाच लाख रूपयांचा अफू व अवैध दारू जप्त केली.
शहादा तालुक्यातील कलमाडी गावाजवळ दारूने भरलेली मालमोटार जाणार असल्याची खबर मिळाल्यानंतर राज्य उत्पादन विभागाचे पथक सक्रिय झाले. या परिसरात पथकाने पाळत ठेवली. यावेळी महिंद्रा नवीस्टार वाहनाच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेऊन पथकाने या वाहनाची तपासणी केली असता बनावट दारूचे २८० बॉक्स आढळून आले. निरीक्षक सुरेश भावसार, तपास अधिकारी अनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. वाहनात १३,४४० बनावट देशी दारूच्या बाटल्या होत्या. या बनावट दारूची किंमत चार लाख तीन हजार रूपये असल्याची माहिती भावसार यांनी दिली. दारूसह संबंधित वाहन असा जवळपास दहा लाख रूपयांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला. वाहनाचा पथकाने पाठलाग केला असता दोन संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी महेंद्रसिंग दौलतसिंग गिरासे याला अटक करण्यात आली आहे. तो वाहनाचा क्लिनर आहे. संशयितांनी बनावट दारू तयार करताना ज्या कंपनीच्या नांवाचा वापर केला, ती कंपनी दीड वर्षांपूर्वी बंद झालेली आहे. डेक्कन बॉटलिंग अॅण्ड डिस्टलरीज् या कंपनीच्या नांवाने ही बनावट दारू तयार करण्यात आली होती. दारूच्या बाटल्यांवरील बॅच क्रमांक तपासताना तो दोन महिन्यांपूर्वीचा असल्याचे लक्षात आले. यावरून प्रथमदर्शनीच ही बनावट दारू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आल्याचे भावसार यांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून वाहन मालकाचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावरील सांगवी शिवारात पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकून अफू व अवैध दारू हस्तगत केली. हॉटेल साईप्रसाद येथे बेकायदेशीररित्या अफू व दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी जोगिंदर सिंग उर्फ झांकीया रघुबिरसिंग चौहाण याला अटक करण्यात आली. हॉटेलमधून ८६८ ग्रॅम अफू व ५८ मद्याच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी दिली. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2013 12:04 pm