लाचखोरी भ्रष्टाचार की शिष्टाचार? याची चर्चा होऊ शकते. त्याचप्रमाणे सापडले तेच दोषी, न सापडणाऱ्यांचे काय? असाही प्रश्न असला तरी आता लाच मागणाऱ्यांना जाळ्यात अकडवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी उरणमधील लोक सरसावले आहेत. मागील सहा महिन्यांत पोलीस तसेच महसूल विभागाच्या सात अधिकारी व कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे लाच घेतल्याशिवाय होत नसल्याचेच उघड झाले आहे. किमान लाचखोरांना आळा बसेल, असा विश्वास आता उरणमधील जनतेकडून व्यक्त केला जात आहे. मात्र यापैकी अनेक तक्रारी या देणाऱ्या आणि घेणाऱ्यातील व्यवहार फिस्कटल्यानेच केल्या जात असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
न्हावा-शेवा या जेएनपीटी बंदराच्या परिसरातील कायदा आणि सुविधा राखण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.डी. कोकरे व त्यांचे सहकारी कोळी या दोघांना उरणमधील सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरातील बांधकाम व्यावसायिकाकडून लाच स्वीकारताना नवी मुंबई लाचलुचपत विभागाने अटक केल्याची घटना ताजी आहे.
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेले वालचंद मुंढे यांना चंदनचोरीच्या प्रकरणात चौकशी करून निलंबित करण्यात आले असून न्हावा शेवा साहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस हवालदारालाही लाचप्रकरणी अटक करण्यात आलेली होती. यापूर्वी उरण पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांवरही लाचलुचपत विभागाने कारवाई केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याच्याच जोडीला महसूल विभागातील दोन तलाठी, दोन मंडल अधिकारी यांच्यावरही यापूर्वी लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे.