तळोजा येथील रेती व्यावसायिक अपहरणप्रकरणी गावातील तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उसने दिलेली रक्कम परत देण्याच्या वादातून या व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांना अटक झाली असली तरी अपहरण तौशीफ अब्दुल हमीद पटेल याचा शोध पोलिसांना अद्याप लागू शकलेला नाही.
तीन दिवसांपूर्वी २२ लाख रुपयांसाठी रेती व्यावसायिक पटेल याचे अपहरण केल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी तळोजा पोलीस ठाण्यात केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला होता. याप्रकरणी अरिफ इकबाल पटेल, सुफियान इकबाल पटेल, मुस्तफा इकबाल पटेल या संशयित आरोपींना पकडले आहे. तळोजा गावात ही घटना घडली होती. उसने घेतलेली रक्कम पटेल याने परत न केल्याने तिघा भावंडांनी हा डाव रचल्याची कबुली दिली. न्यायालयाने या तिघांना २९ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील तौशीफ पटेल हा अजूनही मिळून न आल्याने त्याचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश मोरे यांनी दिली.  पोलीस उपनिरीक्षक राठोड यांचे पथक मुंब्रा, कंसा व कळवा या ठिकाणी संबंधित आरोपींसोबत तौशीफचा शोध घेत आहेत.