पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध दाखल झालेल्या अर्जावरून गैरअर्जदारावर कारवाई करण्यासाठी आणि तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिन्नरच्या वावी ठाण्यातील नाईक भास्कर धोंडीराम महालेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यवसायावरून दोन जणांमध्ये काही वाद झाले होते.
संबंधितांनी परस्परांविरुद्ध वावी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले. या प्रकरणाची चौकशी करून गैरअर्जदार याच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी आणि गैरअर्जदार यांनी तक्रारदारा विरुद्ध दिलेल्या अर्जावरून कारवाई न करण्यासाठी पोलीस नाईक महाले यांनी दोन हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यानच्या काळात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधल्यावर सापळा रचण्यात आला. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास वावी पोलीस ठाण्यालगतच्या शेडमध्ये ही रक्कम स्वीकारत असताना भास्कर नाईकला पकडण्यात आले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.