संचित रजेवरून सुटून तब्बल सात वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या छोटा राजन टोळीतील गुंडाला अखेर पोलिसांनी अटक केली. नाव बदलून तो पोलिसांना चकमा देत होता.
मोहम्मद अली उर्फ बोटी आमदारे (४०) हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीतील गुंड आहे. एका हत्येच्या प्रकरणात त्याला रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात तो दोषी आढळल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. ६ नोव्हेंबर २०११ रोजी त्याला २० दिवसांची संचित रजा मंजूर झाली होता. मात्र बाहेर पडताच तो फरार झाला होता. त्यांनतर तो नाव बदलून रहात होता.
आमदारे हा मंगळवारी मुलुंड येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ८ च्या पथकाला मिळाली होती. पोलीस निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ, सुनील माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीशचंद्र राठोड यांच्या पथकाने मुलुंड पूर्वेच्या गव्हाणपाडा येथे सापळा लावून आमदारे याला अटक केली. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने नाव बदलले होते आणि तो वेल्िंडगची कामे करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.