स्नेहल नागरी पतसंस्थेशी संबंधित प्रकाश देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने २५ लाख रुपयांच्या लाचेचा हप्ता स्वीकारताना मंगळवारी अटक केली. सहकारी बँकेशी संबंधित प्रकरणात तडजोड करण्यासाठी देशमुख यांनी बँकेच्या अध्यक्षाकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती.
फिर्यादी एका सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या बँकेने सभासद आणि इतर नागरी पतसंस्थाना ११९ कोटींचे कर्जवाटप केले होते. परंतु काही नागरी पतसंस्थांनी अटी शर्थीचे भंग करून बोगस कर्जवाटप केले होते. त्याविरोधात फिर्यादी यांच्या बँकेने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. तर नागरी पतंसस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी फिर्यादी यांच्या बँकेच्या संचालकांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा घाटकोपर पोलीस ठाण्यात दाखल कण्यात आला होता.
या प्रकरणात तडजोड करण्यासाठी स्नेहल नागरी पतसंस्थेशी संबंधित असलेले प्रकाश देशमुख यांनी बँकेच्या अध्यक्षांकडे २५ लाखांची मागणी केली होती. त्यापैकी दीड लाखांचा पहिला हप्ता स्वीकारण्यात आला होता. त्यांनतर मात्र त्यांनी तक्रार दाखल केली होती. देशमुख २ सप्टेंबर रोजी दुसरा हप्ता स्वीकारण्यासाठी आले असता लाचलुतपत प्रतिबंधात्मक विभागाने त्यांना अंधेरीच्या हॉटेल रिजेन्सी येथून अटक केली.