एका वृद्ध महिलेच्या हातातील मोबाइल खेचून पळणाऱ्या तरुणास वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून पकडले. रविवारी दुपारी दादरच्या कोतवाल उद्यानात ही घटना घडली.
 रविवारी दुपारी दादरच्या कोतवाल उद्यानाजवळून बेला डिसुजा (७०) या जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका तरुणाने त्यांच्या हातातील मोबाइल खेचून पळ काढला. त्या ठिकाणी माहीम वाहतूक पोलीस ठाण्यातील पाटील आणि सावंत हे दोन पोलीस हवालदार बंदोबस्तासाठी होते. त्यांनी पाठलाग करून या तरुणास पकडले. मुश्ताक शेख (२०) असे या तरुणाचे नाव आहे. त्याला शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
मुंबईत सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असून वाहतूक पोलिसांना आम्ही दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळेच या चोराला पकडणे शक्य झाले असे वाहतूक पोलीस उपायुक्त (दक्षिण) आनंद मंडय़ा यांनी सांगितले.