महिलांवर होणारे अत्याचार या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादाला पोलीस अधिकारी पाठविण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला वेळ नाही. चार वेळा पत्र पाठवूनही अधिकारी कार्यक्रमाला न आल्याने  प्रा. वर्षां भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई पोलिसांच्या निषेधाचा ठराव जमलेल्या महिलांनी एकमुखाने मंजूर केला. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांना या वर्षांतील पहिल्या निषेधाला सामोरे जावे लागले.
देशात अनेक ठिकाणी महिलांवरील अन्याय आणि अत्याचारांत वाढ झाली आहे. त्यामुळे समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न अनेक सामाजिक संघटना तसेच पोलीस दल करीत आहे. अशाच प्रकारे ऐरोली येथील सूर्यदिशा सामाजिक संघटनेने महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांविषयी एका परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यासाठी महिला चळवळीत काम करणाऱ्या भाजपच्या राज्य चिटणीस प्रा. वर्षां भोसले, वकील विशाल मोहिते, पत्रकार राजेंद्र घरत, शिक्षणतज्ज्ञ सुरेश संकपाळ यांना आमंत्रित केले होते. याच वेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने पोलिसांकडून महिलांना मिळणाऱ्या संरक्षणाची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याला या कार्यक्रमासाठी पाठविण्यात यावे असे पत्र दिले होते, पण या पत्राची साधी दखल घेण्यात आली नाही. एका महिला अधिकाऱ्यालाही संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी यांनी पत्र देऊन येण्याची विनंती केली होती. रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गोरख गोजरे यांना कामानिमित्ताने अहमदनगरला जावे लागल्याने त्यांनी कार्यक्रमास येण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे पोलिसांची बाजू मांडणारा एकही अधिकारी या कार्यक्रमाला नव्हता. महिलांवरील अत्याचारांविषयी प्रश्न विचारण्यास अनेक महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यामुळे प्रयत्न करूनही पोलिसांकडून कोणीही उपस्थित राहिले नसल्याचे आयोजकांनी सांगितल्यानंतर संतप्त महिलांनी पोलिसांच्या निषेधाचा ठरावच मांडला. त्याला प्रा. भोसले यांनी अनुमोदन दिले. हा निषेध ठराव नवी मुंबई पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांना पाठविला जाणार आहे. महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न होत असताना नवी मुंबई पोलिसांनी आपल्या उदासीनतेची झलक यानिमित्ताने दाखविली आहे.