News Flash

पोलिसांच्या बॅण्ड पथकाच्या संगीताचा नागरिकांसाठी नजराणा

२ जानेवारीपासून पोलीस स्थापना दिनानिमित्ताने राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांत पोलिसांच्या बॅण्ड पथकाची अनेक ठिकाणी संगीतमय धून नागरिकांच्या कानावर पडल्याने पोलिसांच्या बॅण्डचा नजराणा नागरिकांना अनुभवता आला.

| January 13, 2015 08:58 am

२ जानेवारीपासून पोलीस स्थापना दिनानिमित्ताने राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांत पोलिसांच्या बॅण्ड पथकाची अनेक ठिकाणी संगीतमय धून नागरिकांच्या कानावर पडल्याने पोलिसांच्या बॅण्डचा नजराणा नागरिकांना अनुभवता आला. अनेकांनी पोलीस दादांच्या या पथकाचे छायाचित्रण सोशल मीडियाद्वारे घराघरांत पोहोचविले.
राज्य पोलीस दलातील बॅण्ड पथकाचा इतिहास हा ब्रिटिशकालापासून आहे. इंग्रज देश सोडून गेले, पण त्यांच्या अनेक चांगल्या प्रथांचे आजही पोलीस दलात अनुकरण केले जात आहे. त्यातील बॅण्ड पथक हा एक प्रकार असून यापूर्वी हे पथक बॅगपाइपर नावाने ओळखले जात होते. अलीकडच्या काळात या बॅगपाइपर पथकाने कात टाकून नवनवीन संगीत उपकरणांना आपलेसे केले आहे. त्यामुळे या पथकाची धून केवळ पोलीस कवायती किंवा वरिष्ठांचे स्वागत व निरोपप्रसंगी कानावर पडत होती. त्यामुळे पोलीस दलात बॅण्ड पथक असतो याची कल्पनादेखील अनेक नागरिकांना नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी पोलीस दलापुरता मर्यादित असलेला हा नजराणा पोलीस दल स्थापनेच्या काळात एक आठवडाभर लोकांसाठी खुला केला होता. त्यामुळेच वाशी येथील शिवाजी चौक, ऐरोली येथील रायकर चौक या ठिकाणी या पथकाने आपल्या कलेचा नजराणा नागरिकांना खुला केला. केवळ संगीत वाद्यावर वाजविण्यात आलेल्या या गाण्यांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यात ‘ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी’, ‘मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू’, ‘जिंदगी एक नयी जंग है’, ‘मेरे देश की धरती’ यांसारखी अवीट, अविस्मरणीय, सुमधुर गाणी नागरिकांना ऐकण्यास मिळाली. त्या वेळी अनेक नागरिकांना आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यामधून या पथकांचे फोटो काढले, तर काही जणांनी ही गाणी रेकॉर्ड केली. बॅण्ड पथकांची गाणी ऐकण्यासाठी उपनगरांतील मान्यवर नागरिकांना बोलविण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे स्वागतदेखील पोलिसांनी केले, तर नागरिकांच्या वतीने या पथकाचेदेखील मोठय़ा आनंदाने पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले.

पूर्वी बॅगपाइपर नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बॅण्ड पथकातील संगीत धून जनतेला ऐकवताना आम्हालादेखील आनंद झाला. एका जागी बसून शांत, सुरेल संगीताची धून वाजविण्यासाठी हे पथक प्रसिद्ध असून नवी मुंबईकरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.
    -अरुण वालतुरे,
    साहाय्यक आयुक्त, नवी मुंबई पोलीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 8:58 am

Web Title: police band show in navi mumbai
टॅग : Loksatta,News
Next Stories
1 पनवेल-दिवा-सीएसटी रेल्वेची मागणी
2 सानपाडय़ात साकारणार आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल
3 ऐरोली येथील आंतरराष्ट्रीय दूतावास केंद्राचा प्रकल्प गुंडाळणार
Just Now!
X