चोरटय़ांनी खेचून नेलेल्या अथवा गर्दीत बेमालूमपणे लंपास केलेल्या भ्रमणध्वनीबाबत शहरातील कोणत्याही पोलीस ठाण्यात ‘गहाळ’ या सदरात नोंद झाल्यास संबंधित अधिकारी वा कर्मचाऱ्यांवर आडगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल, असे सुतोवाच पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी केले आहे. भ्रमणध्वनी चोरीला गेला, हरविला तरी आडगाव पोलीस ठाण्यात एक छापील अर्ज तक्रारदाराकडून भरून घेतला जात होता. पुढे त्यावर तपासही केला जात नव्हता. या कारणावरून आडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव महाजन यांना निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. भ्रमणध्वनी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना त्याची नोंद ‘गहाळ’ या सदरात केली जात असल्यावर नुकताच ‘लोकसत्ता – नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली. नागरिकांची तक्रार योग्य पद्धतीने नोंदवून न घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
नाशिक शहरात दागिने खेचून नेणे, दुचाकी वाहनांची चोरी या नित्यनेमाने घडणाऱ्या घटनांमध्ये आता भ्रमणध्वनी चोरीची नव्याने भर पडली आहे. रस्त्याने भ्रमणध्वनीवर संवाद साधत निघालेल्या व्यक्तींवर नजर ठेवून त्यांचे भ्रमणध्वनी खेचून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. गर्दीच्या ठिकाणीदेखील चोरटे बेमालूमपणे भ्रमणध्वनी लंपास करतात. जानेवारी ते मे २०१४ या पाच महिन्यांच्या काळात भ्रमणध्वनी गायब झाल्याच्या १५० हून अधिक तक्रारी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या. त्यातील केवळ पाच टक्के भ्रमणध्वनी चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल असून ८९ टक्के तक्रारींबाबत हरविल्याची नोंद आहे. पोलिसांचा तांत्रिक विश्लेषण विभाग हरविलेल्या भ्रमणध्वनींचा छडा लावू शकतो. जेव्हा एखाद्या नागरिकाचा भ्रमणध्वनी चोरीला जातो, तेव्हा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमार्फत त्याला चोरीची तक्रार देण्याऐवजी तो हरविल्याची तक्रार देण्याबाबत सल्ला दिला जातो. यामुळे त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचे प्रमाण कमी दाखविण्याचाही भाग असतो. चोरीची तक्रार दिल्यास भ्रमणध्वनी न्यायालयीन प्रक्रियेमार्फत ताब्यात मिळेल, त्यासाठी वेळ व वकिलावर पैसा खर्च होईल, असे सांगितले जाते. तक्रारदाराला आपल्या भ्रमणध्वनीशी देणेघेणे असल्याने तो हरविल्याची तक्रार देऊन बोटचेपी भूमिका घेतो. पोलीस व तक्रारदारांची ही कार्यशैली भ्रमणध्वनी लंपास करणाऱ्यांचे बळ वाढविणारी ठरत असल्यावर ‘नाशिक वृत्तान्त’ने बोट ठेवले होते.
तांत्रिक विश्लेषण विभागाने लंपास झालेल्या भ्रमणध्वनीचा तपास लावला तरी ज्याच्याकडे तो भ्रमणध्वनी आहे, त्याच्यावर कारवाई करण्यास मर्यादा येतात. किंबहुना प्रभावी कारवाई होत नाही. कारण तक्रारदाराने भ्रमणध्वनी हरविल्याची तक्रार दिलेली असते आणि ज्याच्याकडे तो असतो, तोदेखील भ्रमणध्वनी सापडल्याचे सांगत असल्याने मग हे प्रकरण तिथेच मिटून जाते. यामुळे भ्रमणध्वनी खेचून नेणारे चोरटे मोकळेच राहतात. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. भ्रमणध्वनी चोरीच्या घटनांना पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून प्रभावीपणे कार्यवाही होत नसल्याची बाब ‘नाशिक वृत्तान्त’मार्फत निदर्शनास आणून देण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी भ्रमणध्वनीची तक्रार नोंदविण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून आडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव महाजन यांना निलंबित केले आहे. आडगाव पोलीस ठाण्याच्या कार्यशैलीने भ्रमणध्वनी तक्रारींची नोंद कशा पद्धतीने घेतली जाते, यावर शिक्कामोर्तब केले आहे. नागरिकांची तक्रार योग्य पद्धतीने नोंदवून न घेणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा सरंगल यांनी दिला आहे.

आडगाव पोलीस ठाण्याचा छापील अर्जाचा कारभार
आडगाव पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनीची तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदारास पोलीस ठाण्याजवळच्या झेरॉक्स दुकानातून छापील अर्ज आणण्यास सांगण्यात येत असे. भ्रमणध्वनी गहाळ झालेला असो वा चोरीला गेलेला असो, सर्वासाठी एकच छापील अर्ज तक्रारदारांकडून भरून घेतला जात होता. गेल्या काही महिन्यात या पद्धतीने जवळपास २९२ छापील अर्ज तक्रारदारांकडून भरून घेण्यात आले. त्यात भ्रमणध्वनीसह इतरही काही चोरीला गेलेल्या वस्तूंचा समावेश होता. यातील एकाही प्रकरणाचा तपास झाला नाही. या शिवाय, लोकशाही दिनानिमित्त तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांना ठाण्याच्या आवारात उन्हात बसवून ठेवण्यात आले. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने त्यांची दखलही घेतली नाही. कामातील हलगर्जीपणावरून पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांना निलंबित करण्यात आले.