गॅसचे भाव कधी कमी होतील, पेन्शन मिळत नाही, बसचे तिकीट खूप महाग झाले आहे, पेट्रोल स्वस्त करा, महागाई कमी करा, भ्रष्टाचारी नेत्यांना शिक्षा करा.. या मागण्या कुठल्याही सरकारी दरबारात नाही, तर चक्क पोलिसांच्या तक्रारपेटय़ांमध्ये करण्यात आल्या आहेत. तक्रारी करायला नागरिकांनी निर्भयतेने पुढे यावे, त्यांना न्याय मिळावा यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन तक्रारपेटय़ांचा उपक्रम  सुरू केला होता. पण या पेटय़ांमध्ये महागाई विरोधातील तक्रारीही करण्यात आल्या आहेत. याचबरोबर २५ तक्रारपेटय़ाच फोडून टाकल्या आहेत.
पोलिसांनी शहरभर तब्बल २९२ तक्रारपेटय़ा ठेवल्या आहेत. २२ ऑक्टोबरपासून या तक्रार पेटय़ांचा शुभारंभ झाला. पोलीस ठाण्यात न जाता कुठल्याही व्यक्तीला या तक्रारपेटय़ांद्वारे आपल्या तक्रारी करता येणार आहेत. जेणेकरून लोकांना न्याय मिळेल आणि दक्ष नागरिकाचे कर्तव्यही पार पाडता येईल. २२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत पोलिसांना या तक्रारपेटय़ांमध्ये एकूण १०८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ७९ तक्रारी पोलिसांच्या कामाबाबतच्या आहेत. १० तक्रारी पोलिसांच्या विरोधातील आहेत. पोलीस तक्रार घेत नाहीत, पोलीस ठाण्यात दम देतात आदी स्वरूपाच्या या तक्रारी आहेत. ३ तक्रारी कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात तर १६ तक्रारी अन्य स्वरूपाच्या आहेत.
याबद्दल माहिती देताना पोलीस उपायुक्त(विशेष शाखा) संजय शिंत्रे यांनी सांगितले की, यापूर्वीही माझ्या परिमंडळात असा उपक्रम राबविला होता, त्यातून एका गंभीर गुन्ह्य़ाची उकलही झाली होती. वायफळ तक्रारी करणाऱ्या दोघांना आम्ही समज दिली आहे.
ही या योजनेची सुरवात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. समाजकंटकांनी २५ तक्रारपेटय़ा फोडल्या आहेत, त्या पुन्हा उभारल्या जातील. ज्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या होत्या त्याची दखल घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. जनता महागाईने त्रस्त झाली असून सरकारदरबारी त्याची दखल घेतली जात नाही. किमान पोलीस तरी त्याची दखल घेतील, असा भाबडा आशावाद त्यांना असावा, असेच एकंदरीत या प्रकाराने दिसत आहे.