गेल्या वर्षी उरण पोलीस ठाण्याचा मुद्देमाल चोरी प्रकरणात मालाची रखवाली करणारा हवालदारच सामील असल्याचे उघडकीस आले असून उरण पोलिसांनी त्याला अटक केली आहे.  सुमारे २८ लाख ९२ हजार रुपयांच्या मुद्देमालाची ही चोरी करण्यात आली होती.
उरण पोलीस ठाण्याचा मुद्देमाल कक्ष हा पोलीस ठाण्याच्या आवारात आहे. या मुद्देमालाच्या सुरक्षेसाठी हवालदार सुभाष पावजी कोकणी याला तैनात केले होते. पोलीस रात्रीच्या सुमारास गस्तीवर गेले की ही संधी साधून कोकणी हा या मुद्देमालाची थोडी थोडी चोरी करायचा.  ७ मे २०१४ रोजीपासून अनेक दिवस रात्रीच्या सुमारास ही चोरी त्याने केली होती. ही चोरी थोडी थोडी करून ती सुमारे २८ लाख ९२ हजारापर्यंत पोहोचली होती. आपला हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून व रकमेत अफरातफर झाल्याचा आरोप आपल्यावर होईल या भीतीने हवालदार कोकणी याने मुद्देमाल कक्षातील रकमेची चोरी झाल्याचा बनाव त्यावेळी रचला होता. या चोरीचा तपास करण्यास  सुरुवात केली त्यावेळी या आवारात पोलीस गार्ड नसल्याचा फायदा घेत ही चोरी झाली असावी असा कयास पोलिसांनी लावला होता.
चोरी करताना मुद्देमालातील दागिने तसेच छोटय़ा रकमांना हात न लावताच ही चोरी करण्यात आल्याने या मागे पोलिसांपैकीच आरोपी असल्याचा संशय आल्याने त्या दिवशी कामावर असलेल्या पोलिसांची चौकशी सुरू करण्यात आली.  त्यांच्या नाकरे तपासण्याही करण्याची तयारी ठेवण्यात आली होती. मात्र आरोपी पोलीसच असल्याने या तपासाला वेळ लागत होता.
शेवटी मुद्देमाल कक्षात काम करणारा हवालदार सुभाष पावजी कोकणी याच्यावर पोलिसांना संशय आल्याने त्या दिशेने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला होता. पोलिसांनी प्रथम आरोपीचे मोबाइल लोकेशन तपासण्यास घेतले.
त्या लोकेशनवरून हवालदार सुभाष कोकणी हा दररोज कोपरखैरणे येथील एका क्लबमध्ये जात असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती उघडकीस आली. कोकणी याच्या बँक खात्याची माहिती घेतल्यानंतर एका बँकेत रोख रक्कम टाकून ती एटीएमने काढली जात असल्याचे समजले.  रक्कम आपल्याच ताब्यात असल्याने या हवालदाराने ती रक्कम एकदम न चोरता थोडी थोडी चोरून ती जुगारात घालवीत असे, अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे, तपास अधिकारी अभय महाजन यांनी दिली.
या प्रकरणी सुभाष पावजी कोकणी या हवालदाराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पाच लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याला उरण न्यायालयाने १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास सुरू आहे.