पोलिसांमधील भ्रष्टाचार मोडून काढण्याच्या परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अभिनाशकुमार यांच्या प्रयत्नामुळे वर्दी आडून लुटणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. तैनाती सोडून महामार्गावर ट्रक चालकांकडून ‘एन्ट्री फी’ वसुली करणाऱ्या दोन शिपायांपैकी एकास निलंबित करून ‘बुरे काम का बुरा नतीजा’ असल्याचे त्यांनी दाखवून दिले.
राष्ट्रीय महामार्गावरील खापरी परिसरात मिहान प्रकल्प असून विविध कंपन्यांचे इंधनआगार आहेत. त्यामुळे येथे मालवाहू वाहनांची नेहमीच वर्दळ असते. नागपुरातील सोनेगाव, ग्रामीणमधील हिंगणा व बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा परिसर मोडतो. रॉकेल, पेट्रोल, डिझेल व इतर रसायनांचा येथे नेहमीच काळाबाजार होतो. टँकरच्या टँकरमध्ये भेसळ केली जाते व त्यामुळे या परिसरात काळाबाजार करणारे आणि त्यांच्याकडून अवैध वसुली करणाऱ्यांचीही गर्दी असते. काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही येथे वावर असल्याचे उघडपणे बोलले जाते. मालवाहू वाहन चालकांकडून ‘एन्ट्री फी’ रोजच उकळली जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे येऊ लागल्या होत्या. अवैध वसुली जुनीच आणि मोठय़ा प्रमाणात असली तरी तक्रारी येत नव्हत्या. मात्र, हद्दीबाहेरचेही येऊन वसुलीत लागल्याने तक्रारींचे प्रमाण वाढू लागले होते.
पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक, सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, पोलीस उपायुक्त अभिनाशकुमार यांच्याही कानावर या तक्रारी आल्या. तक्रारीही शहानिशा करण्यासाठी त्यांनी सोमवारी पहाटे खापरी परिसर गाठला. वाहनावरील दिवा मात्र त्यांनी बंद ठेवला होता. ट्रक चालकांकडून पैसे उकळताना दोन पोलीस त्यांना अगदी जवळून दिसले. तिकडे लक्ष जाताच हादरलेले हे दोघे शहराकडे पळाले. साहेबांना चेहरा दिसला नसेल, असे समजून हे दोघे सोनेगाव पोलीस ठाण्यात शिरले. साळसूदपणे काम करीत असल्याचे दाखवणाऱ्या त्या दोघांना हुडकून अभिनाशकुमार यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्यापैकी एकाने चूक कबूल करून यापुढे घडणार नाही, अशी विनवणी केली. दुसऱ्याने मात्र ‘अघा जे घडलेचि नाही’ असा पवित्रा घेतला. तो खोटे बोलत असल्याचे उपायुक्तांपासून लपून राहिले नाही. चौकशीत या दोघांपैकी एकाला दुसरीकडे तैनात करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी या कारवाईचा अहवाल उपायुक्तांनी पोलीस आयुक्त व सहपोलीस आयुक्तांच्या स्वाधीन केला. खोटे बोलणाऱ्या हवालदार संजय पिल्ले याला निलंबित करण्यात आल्याचे सहपोलीस आयुक्तांनी सांगितले. दुसऱ्याची चौकशी सुरू आहे. पूर्वी काही राजे वेषांतर करून राज्यात फिरून परिस्थितीची स्वत: प्रत्यक्ष पाहणी करीत. वर्तमान काळात पोलीस आयुक्त तसेच प्रामाणिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही वेषांतर करून शहरात फेरफटका मारल्यास गुंड सोडा, अधिनस्थ कर्मचारी काय करताहेत, हे दिसेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता करू लागली आहे.