छत्रपती शिवाजी शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण केल्याच्या गुन्ह्य़ात अडकलेले पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांच्यासह तिघा पोलिसांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागात स्वत:हून शरणागती पत्करली. त्यांना सोमवारी सायंकाळी मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत भोसले यांच्यासमोर हजर केले असता या तिघा पोलिसांना १७ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच वेळी या तिघांचा जामीनअर्जही फेटाळण्यात आला.
पोलीस निरीक्षक अरुण वायकर (४८) यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नितीन चौगुले (३७) व पोलीस नाईक कृष्णात सुरवसे (३७) हे तिघे जण रविवारी सायंकाळी उशिरा राज्य अन्वेषण विभागाच्या स्थानिक कार्यालयात जाऊन हजर झाले. त्यांना लगेचच अटक करण्यात आली. त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान प्रतिबंध कायदा) २०१० चे कलम ४ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. स्थानिक पोलीस यंत्रणेकडून या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही हे प्रकरण स्वत:हून गांभीर्याने घेतल्यामुळे त्याबाबतची चर्चा राज्यभर सुरू आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक ए. के. व्हनकडे यांनी सोमवारी सायंकाळी मुख्य न्यायदंडाधिकारी भोसले यांच्यासमोर हजर केले. पोलीस कोठडी मिळविण्याचा हक्क अबाधित ठेवून या तिघा आरोपी पोलिसांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळण्याची मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली. त्यावर सुनावणी होऊन १७ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली गेली.
दरम्यान, आरोपी पोलिसांतर्फे अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांनी जामीनअर्ज दाखल केला असता त्यावर सुनावणी झाली. डॉक्टरला झालेल्या मारहाणीचे चित्रण असलेले सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. आरोपी हे पोलीस असून यातील पोलीस निरीक्षक वायकर हे राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी आहेत. अन्वेषण विभागाकडे तपासासाठी आता काही शिल्लक उरले नाही. त्यांना जामीन मिळाल्यास ते तपास यंत्रणेला सहकार्य करतील, असे म्हणणे अ‍ॅड. थोबडे यांनी मांडले. तर सरकारी वकील अल्पना कुलकर्णी यांनी, आरोपी हे पोलीस अधिकारी असून त्यांनीच कायदा हातात घेऊन केलेले हिंसक कृत्य गंभीर आहे. त्यांना जामीन मिळाल्यास ते तपासकामात हस्तक्षेप करतील व साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याने जामीन मिळू नये, असा युक्तिवाद केला. अ‍ॅड. कुलकर्णी यांचा युक्तिवाद मान्य करीत मुख्य न्यायदंडाधिकारी भोसले यांनी आरोपी पोलिसांना जामीन नाकारला. या वेळी न्यायालयात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती.