तालुक्यातील बहुचर्चित निघोज येथील सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील सहकारी पतसंस्थेच्या गैरव्यवहारप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र वराळ यांना जिल्हा न्यायालयाने दि. २१पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रक्तदाब वाढल्याने वराळ यांना गुरुवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांच्या वैद्यकीय उपचारानंतर जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.
वराळ पतसंस्थेत लोकांच्या तब्बल ८ कोटी ६७ लाख रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. या प्रकरणी दरोडी येथील नामदेव भोसले यांनी पारनेर पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर संस्थेच्या सुमारे सव्वाशे ठेवीदारांनीही फिर्याद दिली होती. या गैरव्यवहारप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र वराळ, यांच्यासह सर्व संचालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यमुळे या सर्व संचालकांनी नगर जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले होते. परंतु त्यामध्ये संचालक असलेल्या जिल्हा परिषद सदस्य विडनाथ कोरडे व सुभाष भंडारी या दोघांनाच जामीन देण्यात आला, मात्र इतर सर्व संचालकांचे जामीन फेटाळण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करीत इतके दिवस फरार असलेल्या वराळ यांना गुरुवारी अटक केली होती. शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यापूर्वीच रक्तदाब वाढल्यामुळे वराळ यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तीन दिवसांच्या वैद्यकीय उपचारानंतर वराळ यांना जिल्हा न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, जिल्हा न्यायालयाने संचालकांचे अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर महादेव कोल्हे, विश्वनाथ सुलाखे व लामखडे या तीन संचालकांनी औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केले आहेत. त्यावर दि. २३ रोजी सुनावणी होणार आहे.