प्रेमप्रकरणातून कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी स्वत:च्या मुलीची हत्या करणाऱ्या जायभाये शिक्षक दाम्पत्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
शहरातल्या चक्रधर परिसरात माधव जायभाये व त्याची पत्नी छाया हे दोघे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या १७ वर्षीय मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याला त्यांचा विरोध होता. शहरातल्या ब्ल्यू बेल्स महाविद्यालयात १२वीत शिकणाऱ्या या मुलीने प्रेमसंबंधाबाबत ठाम भूमिका घेतल्याने अत्यवस्थ झालेल्या जायभाये दाम्पत्याने १६ नोव्हेंबर रोजी तिची हत्या केली होती. त्यानंतर कंधार तालुक्यातल्या बोरी येथे तिच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या मुलीचा नसíगक मृत्यू झाल्याचा आव जायभाये दाम्पत्याने आणला खरा, पण एका निनावी पत्राने त्यांचे पितळ उघडे पडले. पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने चौकशी करून हे खूनप्रकरण उघडकीस आणल्यानंतर जायभाये दाम्पत्याला भाग्यनगर पोलिसांनी अटक केली होती. रविवारी या दोघांना न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने या दोघांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, भाग्यनगर पोलिसांचा अहवाल सोमवारी शिक्षण विभागाला मिळणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जायभाये दाम्पत्याविरुद्ध निलंबनाची कारवाई होईल, असे शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुलीचे प्रेमसंबंध आपल्याला मान्य नसल्यामुळे आपण रागाच्या भरात हे कृत्य केल्याची कबुली जायभाये दाम्पत्याने दिल्याचा दावा पोलिसांनी केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे यांनी सांगितले.