अवसायनात काढण्यात आलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील पी. के. अण्णा जनता बँकेच्या बेकायदेशीर कर्ज मंजूरप्रकरणी सहा शाखा अधिकाऱ्यांची १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पी. के. अण्णा जनता बँकेत बेकायदेशीर पद्धतीने कर्ज वाटप झाल्याचा ठपवा ठेवून पाच वर्षांपूर्वी ही बँक अवसायनात काढण्यात आली होती. बँकेतील संपूर्ण गैरव्यवहार कोटय़वधी रुपयांच्या घरात असल्याने दीड वर्षांपूर्वी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. बुधवारी रात्रीपासून नाशिकचे सीआयडी पथक येथे दाखल झाले होते. त्यांनी या गैरव्यवहारप्रकरणी मुरार विठ्ठल पाटील, किशोर पुरुषोत्तम पाटील, दिनेश राजाराम साळी, मोहन भिकन चौधरी, हितांशु भुत्ता पटेल, नवीनचंद्र ठाकरसी शेट या सहा शाखा अधिकाऱ्यांना अटक केली. त्यांना न्यायालयापुढे उपस्थित केले असता त्यांची पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
या गुन्ह्य़ातील काही जणांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी हितांशु पटेल हे सहकारमहर्षी पी. के. अण्णा पाटील यांचे निकटवर्तीय आहेत.