01 December 2020

News Flash

गुंड भरत त्यागी खून प्रकरणी नगरसेवक तेलनाडेला कोठडी

कुख्यात गुंड भरत त्यागी खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार इचलकरंजीतील काँग्रेस पक्षाचा नगरसेवक व पाणीपुरवठा समितीचा माजी सभापती संजय तेलनाडे हा कर्नाटकात पोलिसांच्या हाती लागला.

| September 7, 2013 02:00 am

कुख्यात गुंड भरत त्यागी खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार इचलकरंजीतील काँग्रेस पक्षाचा नगरसेवक व पाणीपुरवठा समितीचा माजी सभापती संजय तेलनाडे हा कर्नाटकात पोलिसांच्या हाती लागला. संजय तेलनाडे व अन्य एक आरोपी विठ्ठल सुतार या दोघांना न्यायालयात हजर केले असता १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. त्यागी खूनप्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता १४ पर्यंत गेली आहे. याचबरोबर हा खून नेमका कशाप्रकारे करण्यात आला याचे चित्रही स्पष्ट झाले आहे.    
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, भरत त्यागी उर्फ कांबळे (रा.सिध्दार्थनगर, कोल्हापूर) याने यड्राव येथील रमेश बुरंगे याचा खून केला होता. या खूनप्रकरणावरून भरत त्यागी व विजय पाटील (रा.यड्राव), हरीष उर्फ गोटय़ा नाईक (तारदाळ), जावेद कुन्नूर (तारदाळ), संतोष वाणी (तारदाळ) यांच्यात वैमनस्य होते. तसेच पिंटू जाधव खून खटल्यात अमोल माळी यास संजय तेलनाडे याने मदत केली होती,असा समज त्यागी याचा झाला होता. त्यातून त्यागी व तेलनाडे यांच्यातील वैमनस्य वाढले होते. त्यागी या सर्वावर चिडून होता.    
वैमनस्य वाढीला लागल्याने वरील चौघांनी व संजय तेलनाडे, त्याचा बंधू सुनील तेलनाडे, उदय दत्तात्रय माने यांनी त्यागी याच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी मनिष नागोरी याच्याकडून तीन पिस्तुले विकत घेतली. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी उदय माने याच्याकरवी त्यागी याला मोटारीतून जयसिंगपूरमधील प्रकाश बिअरबार मध्ये आणण्यात आले. तेथे संतोष वाणी, जावेद कुन्नूर, हरीष नाईक, बंदेनवाज मुल्ला, संदीपगायकवाड, प्रकाश हुकीरडे, विठ्ठल सुतार, विजय जाधव, अमोल मोहिते, सचिन खिलारे व सचिन शिंदे यांनी त्यागी याला पिस्तुलातून गोळ्या झाडून तसेच जांबियाने भोसकून ठार केले होते.या गुन्ह्य़ातील आरोपींचा शोध घेत असतांना विठ्ठल सुतार हा आज येथील मुक्त सैनिक सोसायटीमध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीसांना सापडला. तर दुसरा आरोपी तेलनाडे हा संकेश्वर येथील सहारा लॉजमध्ये याच विभागामध्ये पकडला. या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना जयसिंगपूर येथील न्यायालयात उभे केले असता १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
अटकेचे इचलकरंजीत पडसाद
भरत त्यागी खून प्रकरणाचा सूत्रधार नगरसेवक संजय तेलनाडे व त्याचा भाऊ सुनील तेलनाडे असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तेलनाडे याच्यावर कारवाई होण्यामागे राजकीय वाद असल्याची भावना तेलनाडे समर्थकात निर्माण झाली आहे. आवाडे गटाकडून ही कारवाई जाणीवपूर्वक झाली असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते. नगरसेवक तेलनाडे याला त्यागी खून प्रकरणात शुक्रवारी अटक झाली. नेमक्या याच दिवशी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने गावभागातील महादेव मंदिरसमोर उभारलेल्या शुध्द जल प्रकल्पाच्या काचा अज्ञातानी फोडल्या. हा प्रकार याच घटनेतून झाला असल्याची चर्चा आज दिवसभर गावभागमध्ये सुरू होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 2:00 am

Web Title: police custody to sanjay telnade in taygi murder case
टॅग Police Custody
Next Stories
1 नगरजवळ अपघातात औरंगाबादचे एकाच कुटुंबातील तिघे ठार
2 गोदावरीवरील नव्या पुलाला मुहूर्त लागेना
3 तुटलेल्या तारेने घेतला बळी, विजेच्या धक्क्य़ाने तरूणाचा मृत्यू
Just Now!
X