बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर संपवून घरी जाणाऱ्या मुलीची छेडछाड करणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
नवी दिल्ली येथील घटनेनंतर नव्याने आलेल्या लैंगिक अपराध व महिला संरक्षण कायदा २०१२ व २०१३ अनुसार झालेली सातारा जिल्ह्य़ातील ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे. वाई तालुक्यातील ग्रामीण भागातील एक मुलगी बारावीचा पेपर संपवून आपल्या घरी जात होती. आपल्या गावी जाण्यासाठी वडापच्या जीपने गावी जाणाऱ्या गाडीत बसली असता दुचाकीवरून एक युवक तिच्या गाडीजवळ आला. आपला मोबाइल क्रमांक तिला सांगितला व मिस कॉल दे म्हणू लागला. त्या युवकाच्या बोलण्याकडे मुलीने दुर्लक्ष केले. गाडी तिच्या गावाकडे जाऊ लागली. मुलगी दुर्लक्ष करत असल्याचा राग त्याला आला. युवकाने त्या जीपचा पाठलाग करत मुलीचे गाव गाठले. मुलगी जीपमधून उतरून घरी जाऊ लागली. तेव्हा त्याने आपली दुचाकी तिला आडवी घातली आणि ‘जर तू मला या नंबरवर फोन केला नाहीस तर मी संध्याकाळी घरी येईन’ सांगितले. मुलीने घरी आपल्या कुटुंबीयांना ही गोष्ट सांगितली. पोलिसात तक्रार देण्यास आलेल्या मुलीची बाजू ऐकून पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी भादंवि ३५४ अनुसार गुन्हा दाखल केला.
सदर युवकाने काही महिन्यांपूर्वी मुलीची छेड काढली होती. त्याने माफी मागितल्यानंतर हे प्रकरण संपविण्यात आले होते. मात्र या वेळी पोलिसांनी त्याला सोडले नाही. रविराज सर्जेराव काळे याला पोलिस कोठडी दिली आहे.
महिला अत्याचार व संरक्षण कायद्यानुसार २०१२ /२०१३ अनुसार १८ वर्षांखालील मुलगा- मुलगी यांच्या संबंधी लैंगिक अपराध संरक्षण कायद्यानुसार यापुढे मुलींना फोन करणे, धमकी देणे, पाठलाग करणे, मागे पुढे फे ऱ्या मारणे, अश्लील चाळे करणे, एसएमएस करणे, फोन वर अश्लील बोलणे आदींबाबत गुन्हा दाखल करण्याचा आदेश आहे. हा गुन्हा अजामीनपात्र आहे.