डोंबिवलीजवळील लोढा हेवन गृहसंकुल परिसरातील अनेक व्यापाऱ्यांकडून दमदाटी, धमक्या देऊन नवरात्रोत्सवासाठी जबरदस्तीने वर्गणी जमा करणाऱ्या निळजे गावच्या सरपंच व जय भवानी मित्र मंडळाचा अध्यक्ष सतीश अनंत पाटील व पदाधिकारी सुरेश कदम यांच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
निळजे गाव परिसरात लोढा हेवन भव्य गृहसंकुल आहे.  सण, उत्सव काळात निळजे परिसरातील मंडळांचे पदाधिकारी दमदाटी, धमक्या देऊन येथील व्यापाऱ्यांकडून जबरदस्तीने वर्गण्या जमा करतात असे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नवरात्रोत्सव जवळ आल्याने निळजे गावातील शिवसेना पुरस्कृत ‘जय भवानी मित्र मंडळा’चे अध्यक्ष व गावचे सरपंच सतीश अनंत पाटील, सुरेश कदम लोढा हेवनमधील व्यापारी पेठेत वर्गणी गोळा करण्यासाठी फिरत होते. ते जबरदस्तीने एक हजाराहून अधिक रकमेच्या पावत्या फाडून व्यापाऱ्यांच्या अंगावर फेकत होते. जे व्यापारी वर्गणीची रक्कम कमी करा. मंदी आहे, असे सांगत होते त्यांना सतीश पाटील धमक्या देत, असे व्यापाऱ्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
उत्तम पटेल यांचे लोढा हेवनमध्ये फर्निचरचे दुकान आहे. शुक्रवारी संध्याकाळी सतीश पाटील, सुरेश कदम दुकानात आले. त्यांनी नवरात्रोत्सवाच्या वर्गणीची अडीच हजार रुपयांची पावती पटेल यांच्या हातात दिली. चालू वर्षी मंदी आहे. एवढी रक्कम मी देऊ शकत नाही असे पटेल यांनी सांगताच, पाटील यांनी त्यांना धमकी दिली. घाबरलेल्या पटेल यांनी जवळील अडीच हजारांची रक्कम दिली. ही बाब पटेल यांनी संकुलातील व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मोहनसिंग राजपूत यांना सांगितली. या विषयावर व्यापारी संघटनेची बैठक घेतल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी पाटील यांनी आपल्याकडून दमदाटीने नवरात्रोत्सव वर्गणी घेतली असल्याचे सांगितले. या बैठकीत पाटील व कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भवर राठोड यांच्याकडून ११०० रुपये, छोगाराम चौधरी २१०० रुपये, मनोज कनोजिया ५०१ रुपये तसेच इतर व्यापाऱ्यांकडून दमदाटीने वर्गणी वसूल करण्यात आल्या आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय पवार तपास करीत आहेत. दरम्यान, सतीश पाटील हे गावचे सरपंच असल्याने त्यांची तक्रार ठाणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे येथील काही राजकीय मंडळींकडून बोलले जात आहे.