र्मचट नेव्हीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आठ बेरोजगारांची बारा लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी एका महिलेसह चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संतोषकुमारसिंह (रा. सागर भोपाळ), मुकूल गौर (रा. तुमसर), अतुल मिश्रा (रा. भोपाळ) व श्रद्धा मोरे (रा. सदर नागपूर) ही आरोपींची नावे आहेत. या चार आरोपींनी गेल्यावर्षी ‘क्विन स्टार शिपिंग कंपनी लिमिटेड’ स्थापन केली. वर्धा मार्गावरील प्राईड हॉटेलमागील इंगोलेनगरात या कंपनीचे कार्यालय उघडले. र्मचट नेव्ही व इतर ठिकाणी नोकरी मिळवून देण्याच्या त्यांनी जाहिराती केल्या. त्यास अनेक बेरोजगार बळी पडले. हरीश चंद्रशेखर पौनीकर (रा. धनगवळीनगर) व इतर सात तरुणही त्यात अडकले. त्यांच्याकडून नोकरी लावून देण्यासाठी आरोपींनी एकूण बारा लाख रुपये घेतले. आरोपी नोकरी लावून देत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर हरीश व इतर तरुणांनी त्यास रक्कम परत मागितली. ती परत देण्यासही तो टाळाटाळ करू लागल्याने हरीश व इतर सातजणांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. सोनेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.