दुबई (शारजाह) येथे हॉटेल उघडून देण्याचे आमिष दाखवून टपाल विभागातील एका सेवानिवृत्त अधिकारी व त्यांच्या मुलीला ५६ लाखाने फसवल्याचे उघडकीस आले आहे. अंबाझरी पोलसांनी मंगलोर येथील चार आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सूरजबाबू गौडा कोयीयान, अजयबाबू गौडा कोटीयान, चंद्रशेखर उपाध्याय आणि कृष्णानंद उपाध्याय अशी आरोपींची नावे आहेत.
शांतीनगरातील शेख अजीज शेख जुम्मन (६६) टपाल विभागात सहायक पोस्ट मास्तर जनरल पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांची मुलगी तसमीन कौशर या दुबईतील बँकेत अधिकारी आहेत. दुबईत काम करत असताना आरोपींसोबत तसमीन यांची ओळख झाली.
आरोपींनी तसमीनला हॉटेलच्या व्यापारात खूप लाभ असल्याचे सांगून भागीदारीत हॉटेल उघडण्याचे आमिष दाखवले व ती आमिषाला बळी पडली. तिने शारजाह येथे हॉटेल उघडण्याची योजना आखली. तिने आपल्या वडिलांनाही ही योजना सांगितली. मुलीची इच्छा असल्याने वडीलही तयार झाले. त्यानुसार हॉटेलसाठी शेख अजीज यांनी २९ ऑगस्ट २००९ ला आरोपींना कर्नाटक बँकेच्या गांधीनगर शाखेतून ६ लाख रुपये दिले. यानंतर १ मे २०१० दरम्यान त्यांनी १३ लाख ५० हजार रुपये आरोपीला दिले. या दरम्यान तसमीननेही आरोपीला दुबईच्या इमीरेट एनडीडी बँकेतून २ लाख ८५ हजार ३०८ दिरहम (दुबईचे चलन) दिले. अशाप्रकारे शेख अजीज आणि तसमीन यांनी आरोपीला एकूण ५६ लाख ३७ हजार ४५० रुपये दिले.
 काही दिवसानंतर आरोपींनी शारजाह येथे हॉटेल उघडले. सुरुवातीला हॉटेल चांगले चालले. लाभ होत असल्याने आरोपींची नियत बिघडली. त्यांनी लाभाचे पैसे आपल्याजवळ ठेवून घेतले. पुढे मात्र योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे हॉटेल डबघाईस आले. त्यामुळे आरोपींनी तसमीनला विश्वासात न घेता हॉटेल दुसऱ्याला विकले. हॉटेल विकून मिळालेले पैसे घेऊन आरोपी भारतात परत आले.
गेल्यावर्षीपासून तसमीन आणि तिचे वडील गुन्हा दाखल करण्यासाठी भटकत होते. त्यांनी भारतीय दुतावासासह अनेक ठिकाणी तक्रार दाखल केली आहे. दोन देशांचे प्रकरण असल्याने पोलिसांसमोरही प्रश्न उभा आहे. रविवारी अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.