उत्तर महाराष्ट्रातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्णत्वास गेली असून शुक्रवारी अवघ्या चार ते पाच तासांत म्हणजे दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व जागांवरील निकाल हाती येणार आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाशिक मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे छगन भुजबळ, महायुतीचे हेमंत गोडसे व मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांच्यात चुरशीची लढत होत आहे. निकाल जाहीर झाल्यावर शहरात अनुचित पडसाद उमटू नये, याकरिता पोलीस यंत्रणेने सर्व शक्यता गृहीत धरून बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. निवडणुकीत झालेले अंतर्गत मतभेद वा अन्य काही बाबी उफाळून येऊ नयेत, यासाठी उमेदवारांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेने सीसीटीव्ही कॅमेरे तसेच मोजणीच्या प्रत्येक टेबलवर सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील सहा जागांवर गत महिन्यात २४ तारखेला मतदान झाले होते. जवळपास २१ दिवसांपासून ताणली गेलेली निकालाची उत्सुकता संपुष्टात येत आहे. सकाळी आठ वाजता सर्व मतदारसंघातील मतमोजणीला कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरुवात होईल. नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी अंबड औद्योगिक वसाहतीतील अन्न महामंडळाच्या मध्यवर्ती गोदामात (सेंट्रल वेअरहाऊस) होणार आहे. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन यंत्रणेने तयारी पूर्णत्वास नेली. नाशिक मतदारसंघात १५ तर दिंडोरीत एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी एकाच ठिकाणी होणार असल्याने येथे मोठा फौजफाटा तैनात राहील. मतमोजणीच्या कामासाठी एकूण ६५० कर्मचारी व अधिकारी कार्यरत राहतील. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होईल. एकेका फेरीचे निकाल जाहीर होण्यास यापूर्वी बराच कालापव्यय होत असे. यंदा मात्र तसे होणार नाही. मीडिया सेंटर येथे फेरीनिहाय तत्परतेने पडद्यावर जाहीर केले जातील. तसेच ध्वनिक्षेपकाचीही व्यवस्था करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सांगितले.
मतमोजणी केंद्राभोवती त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दंगा नियंत्रण पथक, केंद्र व राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सज्ज राहणार आहे. मतमोजणी केंद्राच्या सभोवताली २०० मीटरच्या क्षेत्रात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. भ्रमणध्वनी, ज्वलनशील पदार्थ, घातक शस्त्रे बाळगण्यास अथवा घेऊन फिरण्यास मनाई करण्यात आल्याचे साहाय्यक आयुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी म्हटले आहे.
मतमोजणीच्या पाश्र्वभूमीवर, अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअरहाऊस परिसरात वाहतूक टाळण्यासाठी पोलीस यंत्रणेने शुक्रवारी या भागातील ग्लॅक्सो कारखाना ते संजीवनी बॉटनिक नर्सरी, सेंट्रल वेअरहाऊससमोरील मुख्य रस्ता तसेच ओमसाई किचन कंपनी ते प्रिंटेक्स इंजिनीअर्स हे रस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली जाईल. पहाटे पाच ते सायंकाळी पाच या बारा तासांच्या कालावधीत हे र्निबध लागू राहतील. मतमोजणीवेळी राजकीय पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची एकाच ठिकाणी आणि समोरासमोर गर्दी होऊ नये याकरिता निवडणूक यंत्रणेने प्रत्येक पक्षासाठी मतमोजणी केंद्रावर येण्यासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित केला आहे. तसेच उपरोक्त मार्गावर संबंधितांसाठी स्वतंत्रपणे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये काँग्रेस आघाडीचे भुजबळ, महायुतीचे गोडसे तर मनसेचे डॉ. पवार यांच्यात चुरशीची लढत आहे. या मतदारसंघात धक्कादायक निकाल बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. निवडणूक काळात राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत पातळीवर अनेक कुरबुरीच्या घटना घडल्या. काँग्रेस आघाडीत कुरबुरींचे प्रमाण अधिक होते. धक्कादायक निकाल बाहेर आल्यास त्याचे पडसाद उमटू शकतात. अशा सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस यंत्रणेने शहरातील बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सर्व प्रमुख उमेदवारांचे निवासस्थान, राजकीय पक्षांची कार्यालये, वाद उफाळू शकतात अशी ठिकाणे, प्रमुख रस्त्यांवर तपासणी नाके या ठिकाणी पोलीस तैनात राहतील.
धुळे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत होणार आहे. मतमोजणीसाठी पोलीस यंत्रणेने ५१२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. या व्यतिरिक्त राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, दोन दंगा नियंत्रक पथक कार्यरत राहतील. जळगाव व रावेर मतदारसंघांची मतमोजणी जळगाव शहरालगतच्या औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. या ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणतेही वाद उद्भवू नयेत, याकरिता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जिल्हा परिषदेसमोरील सामाजिक न्याय भवन येथे होणार आहे. मतमोजणीवेळी यंदा प्रत्येक टेबलवर सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

चुरशीच्या लढतीत कोण विजयी होणार ?
नाशिक – काँग्रेस आघाडीचे छगन भुजबळ, महायुतीचे हेमंत गोडसे व मनसेचे डॉ. प्रदीप पवार
दिंडोरी – महायुतीचे हरिश्चंद्र चव्हाण व काँग्रेस आघाडीच्या डॉ. भारती पवार
धुळे – महायुतीचे डॉ. सुभाष भामरे व अमरिश पटेल
नंदुरबार – काँग्रेस आघाडीचे डॉ. माणिकराव गावित, डॉ. हिना गावित
जळगाव – महायुतीचे ए. टी. पाटील व काँग्रेस आघाडीचे सतीश पाटील
रावेर – महायुतीच्या रक्षा खडसे, काँग्रेस आघाडीचे मनीष जैन व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार उल्हास पाटील