ती नकोशी होती म्हणून तिला तिच्या जन्मदात्यांनी पनवेल-मुंब्रा महामार्गालगतच्या कळंबोली गावाजवळील काळभैरव मंदिराशेजारी रस्त्याकडेला सोडले. ही घटना बुधवारी रात्री घडली. येथून जाणाऱ्या वाटसरूने एखाद्या हिरव्या साडीच्या पुंजक्यात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत असल्याची खबर पोलीस ठाण्यात दिल्यावर पोलीसही घटनास्थळी धावले.  पोलिसांनी हे बाळ ताब्यात घेतले आणि तपासाला सुरुवात केली. वैद्यकीय आधारावर या बाळाला अजून एक महिना पूर्ण झाला नसल्याचे समजले. ती मुलगी असल्याने ती पालकांना नकोशी झाल्याचा पोलिसांचा कयास आहे. अवघ्या काही दिवसांचा तिचा जन्म असल्याने पोलिसांना काय करावे समजत नव्हते. गुन्हेगाराची बोबडी वळवणारे कळंबोली पोलीस बुधवारच्या या नकोशीच्या सापडण्याने काही वेळासाठी गप्प झाले होते. तिच्या पुढील उपचारासाठी पोलिसांनी वैद्यकीय क्षेत्राचे दार ठोठावले. रातोरात एमजीएम कामोठे, बेलापूर व सरकारी ग्रामीण रुग्णालयांतील डॉक्टरांकडे पोलिसांच्या गाडीतून या नकोशीच्या प्रकृतीसाठी तिला नेण्यात आले. जन्मदात्यांसाठी नकोशी असलेली ही पोलिसांच्या तपासादरम्यान हवीशी झाली होती. सध्या तिची जोपसना नेरुळ येथील बालकल्याण मदतकेंद्रात केली जात आहे. लवकरच या बालिकेच्या भविष्यातील पालकत्वाच्या तरतुदीसाठी धर्मादाय आयुक्तांसमोर हिची फिर्याद मांडली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कोवळ्या बालिकेच्या पडद्याआड लपणाऱ्या पालकांचा शोध घेण्यासाठी कळंबोली पोलीस पनवेल परिसरात जन्माला आलेल्या बाळांची माहिती मिळविण्यासाठी सर्व रुग्णालये, दवाखाने पालथे घालत आहेत.