बॅंकांच्या एटीएम सेंटरमध्ये भरण्यासाठी नेणारी रक्कम कंपनीच्या वाहनचलकांनीच लुटून नेल्याच्या दोन घटना मागील तीन महिन्यात घडल्या आहेत. कंपनीचा गलथानपणा, सुरक्षेबाबतचे न पाळलेले नियम यामुळे हे प्रकार घडले होते. याची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेतली असून अशा कंपन्याच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना कडक सूचना दिल्या आहेत.
२७ मार्च रोजी सायन ट्रॉम्बे रोड वर एका बॅंकेच्या एटीएम सेंटर मध्ये पैसे भरण्यासाठी निघालेली गाडी कंपनीच्याच चालकाने पळवून नेली होती. त्यावेळी गाडीत १ कोटी २८ लाख रुपये होते. असाच प्रकार फेब्रुवारी महिन्यात विलेपार्ले येथे घडला होता. या दोन्ही प्रकरणात वाहन चालकांबाबत काहीही माहिती बॅंक अथवा कंपन्यांना नव्हती. बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम बॅंका लॉजीकॅश कंपन्यांना देतात. या कंपन्या मग ट्रॅव्हल कंपन्यांकडून गाडय़ा भाडय़ाने घेतात तसेच खाजगी सुरक्षा कंपन्यांना सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट देतात. मात्र कुणाकडेच या कर्मचाऱ्यांची माहिती नव्हती. ट्रॉम्बे येथे सेंट्रल बॅेंक ऑफ इंडियाची रोकड पळवून नेणाऱ्या चालकाचे पूर्ण नाव देखील ट्रॅव्हल कंपनी आणि लॉजीकॅश कंपन्यांना माहित नव्हते. त्यामुळे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी यांनी लॉजीकॅश कंपनीच्या प्रतिनिधींची एक बैठक बोलावून त्यांनी सक्त सुचना दिल्या. या बैठकीत एकून ३७ कंपन्यांचे प्रतिनिधी आवश्यक होते. एटीएमची रोकड वाहून नेणाऱ्या गाड्यांमध्ये जीपीआरएस आणि सीसीटीव्ही लावणे, कर्मचाऱ्यांचे संपूर्ण तपशिल आणि पडताळणी केल्याशिवाय कामावर न घेणे, त्यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी तपासणे, ओळखपत्र सक्तीचे करणे, एटीएममध्ये पैसे भरत असताना आत आणि बाहेर कर्मचारी कसे उभे राहतील याचे नियोजन करण्याबाबतच्या सुचनांचा समावेश आहे. या सुचनांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.