रस्तापूर (ता. नेवासे) येथील अंबिका डुक्रे खूनप्रकरणाचा यशस्वी तपास करून, अंबिकाच्या मारेकऱ्यास फाशीची शिक्षा झाल्याबद्दल डुक्रे कुटुंबीय व रस्तापूरच्या ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्यासह तत्कालीन तपास पथकातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करून पोलिसांच्या चांगल्या कामाची समाज निश्चितच दखल घेतो, याचा अनुभव दिला.
अंबिकाचा मारेकरी अनिल जगन्नाथ पवार याला मंगळवारी श्रीरामपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली, तेव्हाही त्याच दिवशी सायंकाळी डुक्रे कुटुंबीय व ग्रामस्थांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांना दूरध्वनी करून आभारही मानले होते. गेल्या सात वर्षांपासून फरार असलेल्या पवार याच्या अटकेसाठी कृष्णप्रकाश यांनी विशेष पथक नियुक्त केले होते. फरारी पवारच्या अटकेच्या मागणीसाठी रस्तापूर, चांदा येथील ग्रामस्थांनी त्या वेळी आंदोलनेही केली.
आज सायंकाळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य विजयाताई अंबाडे यांच्या नेतृत्वाखाली अंबिकाचा मामा ज्ञानदेव कोलते, भाऊ सागर डुक्रे, मामेभाऊ राजीव कोलते, शहापूरचे सरपंच माणिकराव कोलते, रामकृष्ण आंधळे, नाना महाडिक, शिवाजी कोलते यांनी त्या वेळच्या तपास पथकातील निरीक्षक अशोक राजपूत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी संजय इस्सर, राजेंद्र वाघ, भरत डोंगरे, आघाव, शरद लिपाणे आदींचा तसेच शाखेचे सध्याचे निरीक्षक अशोक ढेकणे आदींचा सत्कार केला.