तालुक्यातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूलमध्ये ८ व्या व ९ व्या इयत्तेत शिकणा-या दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र पवार यांना आरोपींचे मोबाईल क्रमांक मिळाले असून त्यांनी तातडीने संपर्क करून पोलिसी खाक्या दाखविताच अपहरण केलेल्या दोन मुली वैजापूर बसस्थानकाजवळ दोन नराधमांनी सोडून दिल्या. या प्रकरणी पोलिसांनी भोजडे येथील आरोपी महेश बाबुराव खोडके (वय २२) व सुशांत दत्तात्रय धनाड (वय २५) यांच्या विरुद्ध अपहरण तसेच अल्पवयीन लैंगिक शोषण आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मोबाईल टॉवरच्या लोकेशननुसार आरोपींचा शोध सुरू केला.
याबाबतउपनिरीक्षक रामचंद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान भोजडे येथील आरोपी महेश खोडके, सुशांत धनाड इंडिका कार (एमएच २०, ३२२३) घेऊन जनता इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ आले व त्यांनी सुरेखा व कल्पना (नावे बदललेली आहेत) या दोन विद्यार्थिनींना शाळेच्या मधल्या सुट्टीत प्रवेशद्वारावर ‘तुमच्या मामाने तातडीने बोलाविले आहे’ असे म्हणून गाडीत बसविले व नागपूर-मुंबई रस्त्यावरून वैजापूरच्या दिशेने घेऊन गेले. दरम्यान एका मुलीचा मामा व एका मुलीचा भाऊ या दोघांनी झालेली घटना पोलीस ठाण्यात येऊन सांगितली. पवार यांना आरोपींचे मोबाईल क्रमांक मिळाल्याने त्यांनी आरोपींशी संपर्क साधला व पोलिसी खाक्या दाखवत सदर मुलींना तुम्ही शाळेत आणून सोडले नाही तर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू, असा दम भरला. आरोपी खोडके व धनाड घाबरले, त्यांनी सदर मुलींना वैजापूर बसस्थानकाजवळ नेऊन सोडले. तेथून ते इंडिका कारने पळून गेले. त्यातील एका मुलीने कॉईन बॉक्सवरून मामाला दूरध्वनी केला. तातडीने उपनिरीक्षक रामचंद्र पवार यांनी कॉन्स्टेबल सागर सदाफळ, संजय घोरपडे, असीर सय्यद, अशोक शिंदे, चालक भिंगारदिवे यांना बरोबर घेऊन तातडीने वैजापूर गाठले. तेथे या अल्पवयीन मुली सापडल्या. त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरविल्याने सदर अल्पवयीन मुली होणा-या अत्याचारातून सुदैवाने बचावल्या गेल्या. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध अल्पवयीन मुलीचे अपहरण करणे, लैंगिक शोषण करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला. शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक यांनी मुला-मुलींवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. उपनिरीक्षक पवार यांनी गतीने तपास चक्रे फिरवल्याने मुली बचावल्या, त्यांचे व पोलिसांचे अभिनंदन होत आहे.