आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांत मोठय़ा प्रमाणात स्पॉट फिक्सिंग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सावध झालेल्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सट्टेबाजांची यादी तयार करून त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे ठरविले आहे. आवश्यकता भासल्यास या सट्टेबाजांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सट्टेबाजांचे थेट दाऊदशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले असून त्याचा तपास सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
स्पॉट फिक्िंसगप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या मुदगल समितीने आयपीएल सामन्यांतील सट्टेबाजीबाबत मुंबई पोलिसांना दाऊद इब्राहिम टोळीचा सहभाग स्पष्ट करता न आल्याबाबत ताशेरे ओढले होते. परंतु याबाबत आपली भूमिका समितीने नीट समजावून घेतली नाही, असे गुन्हे विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रमेश व्यास याला मुंबई पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ९२ मोबाईल फोन आणि १८ सिम कार्ड जप्त केली होती. देवेंद्र कोठारी आणि अफरोझ या कट्टर सट्टेबाजांच्या तो संपर्कात होता. दाऊदचा भाऊ अनिस याच्यामार्फत सुरू असलेल्या दक्षिण भारतातील सट्टेबाजांच्या टोळीच्या तो संपर्कात असल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती होती. व्यास याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने हा दुवा अधिक बारकाईने तपासला नाही, असा या समितीचा आरोप होता. परंतु त्या दिशेने तपास सुरू होता, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर व्यासला दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतही तो दुवा स्पष्ट झाला आणि त्यानंतर आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
कोण आहे हा व्यास?
रस्त्यावरील एका हॉटेलात मदतनीस म्हणून काम करणारा रमेश व्यास हा पूर्वी कपडा व्यापारी होता. सार्वजनिक दूरध्वनी केंद्रही चालवित होता. त्या माध्यमातूनच तो कोठारी आणि अफरोझ यांच्या संपर्कात आला. त्यांना आवश्यक तो दूरध्वनी संपर्क करून देण्याचे काम तो करीत होता. त्याला प्रति मिनिट ८०० रुपये हवालामार्फत मिळत होते. त्यानंतर त्याने बोगस कागदपत्रांच्या आधारे अनेक मोबाईल कनेक्शन मिळविली होती. त्याद्वारेही तो सट्टेबाजांना मदत करीत होता, अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागातील सूत्रांनी दिली.