अवघ्या महाराष्ट्राचे सांस्कृतिकआकर्षण ठरलेल्या आणि मानवी मनोऱ्यांच्या साहाय्याने रोमांच उभे करणाऱ्या दहीहंडी उत्सवात गुटखा, मावा, जर्दा यांसारख्या तंबाखू उत्पादनांचा मोठय़ा प्रमाणावर काळा बाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी मोठय़ा दहीहंडी उत्सवांवर बारीक नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शारीरिक सामर्थ्यांची कसोटी लागत असल्यामुळे व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या ‘खेळात’ अगदी सुरुवातीपासून नशाबाजांची अपप्रवृत्ती शिरल्याचेही वेळोवेळी दिसून आले आहे. ठाण्यात उंचच्या उंच मानवी मनोरे रचण्यासाठी खेळाडू ‘संघर्ष’ करीत असताना मराठमोळी ‘संस्कृती’ जपण्याचा दावा करणारे आयोजकच या गोविंदांना स्फुरण चढावे यासाठी गुटख्याची पाकिटे विकत असल्याचे काही वर्षांपूर्वी दिसून आले होते. गेल्या वर्षीही काही ठिकाणी हा प्रकार दिसून आला. त्यामुळे अशा उत्सवात गुटख्याचा सर्रासपणे काळा बाजार सुरू असल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकाऱ्यांची यंदा या उत्सवातील गुटखाबाजीवर नजर असणार आहे.
दहीहंडी उत्सवानिमित्ताने मानवी मनोरे रचण्याचा सराव करणाऱ्या गोविंदांना वर्षांनुवर्षे वेगवेगळ्या व्यायाम मंडळांकडून सहकार्य मिळत असल्याचे दिसून आले आहे. व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करताना या उत्सवांना गेल्या काही वर्षांत मोठे महत्त्व मिळाले. मानवी मनोरे रचनाला शारीरिक क्षमतेची कसोटी लागते आणि त्यासाठी व्यायाम महत्त्वाचा असे गणित वर्षांनुवर्षे मांडले जात होते. असे असले तरी गेल्या काही वर्षांत दहीहंडीला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आणि दिवसभरात हंडय़ा फोडून थकलेले गोविंदा रात्री उशिरापर्यंत जोम कायम राहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या नशेचा आधार घेऊ लागले. काही वर्षांपूर्वी ठाण्यातील एका मोठय़ा दहीहंडी आयोजकाने गोविंदांना गुटख्याची पाकिटे वितरित केली. त्यामुळे उत्सवातील मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातोय का, अशी विचारणा सर्वत्र होऊ लागली. गोविंदांना अशा प्रकारे गुटख्याची पाकिटे वाटणे योग्य आहे का, अशा विचारणा करणाऱ्या सुज्ञ नागरिकांसोबत काही आयोजक ‘संघर्षां’ची भूमिका घेऊ लागले. संघर्षांच्या वाटेवर अशा प्रकारे गुटखाविक्री सुरू होताच ‘संस्कृती’रक्षणाचा दावा करणाऱ्या आयोजकांनीही हजारोंनी गुटख्याची पाकिटे वाटण्यास सुरुवात केली. एकूणच उंच मनोऱ्यांचा झगमगाट एकीकडे सुरू असताना गुटखा, मावा, जर्दाची लयलूट होत असल्याचे चित्र अगदी स्पष्टपणे दिसू लागले. गुटखाबंदीचा निर्णय होताच गेल्या वर्षी मात्र अशा प्रकारच्या मोकळ्या वाटपाला आयोजकांनी लगाम घातला. तरीही काळा बाजार करण्यात माहीर असलेल्या विक्रेत्यांनी उत्सवांच्या वाटेवर गुटख्याचा बाजार सुरूच ठेवला. यासंबंधी वारंवार तक्रारी पुढे येत असल्यामुळे खडबडून जागे झालेल्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी यंदा काही मोठय़ा उत्सवांवर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परराज्यांतून यानिमित्ताने मोठय़ा प्रमाणावर गुटख्याची पाकिटे मुंबई, ठाण्यात विक्रीसाठी आल्याची माहिती असून त्या दृष्टीने तपासही केला जात आहे. यासंबंधी अन्न आणि औषध विभागाचे ठाणे विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारच्या काळ्या बाजाराची कोणतीही ठोस माहिती आमच्याकडे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. उत्सवात एखादा गुटखा खात असेल तर अशा व्यक्तीवर कारवाई कशी करायची, असा प्रश्न असला तरी सर्रासपणे विक्री होत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे कोणतीही माहिती मिळाल्यास यासंबंधी आमच्या विभागाकडे तातडीने कळवावी, असे आवाहनही त्यांनी केले.