गुन्हेगार असणाऱ्या आरोपीकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांगली येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यातील सहायक फौजदारास रंगेहात पकडले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक फौजदार नंदकिशोर रघुनाथ कोळेकर यास अटक केली असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.    
राजू साबू हेगडे (वय २७ रा. उल्हासनगर कूपवाड, मिरज) हा काही खटल्यांमध्ये आरोपी आहे. याच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचे काम सुरू होते. आरोपपत्र व त्याच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढण्यासाठी कोळेकर याने हेगडे याच्याकडे एक हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यावर हेगडे याने १८ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. बुधवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात कोळेकर हा हेगडे याच्याकडून एक हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहात पकडला गेला.     
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय सूर्यवंशी, वसंतराव बाबर, सचिन कुंभार, चंद्रकांत गायकवाड, सुनील राऊत, गणपत कारंडे, दादासाहेब मगदूम यांच्या पथकाने केली.