News Flash

राष्ट्रवादी कामगार सेनेच्या अध्यक्षाला पोलीस अधिकाऱ्याची मारहाण

दीडशे मराठी कामगारांना कमी करून ३५० परप्रांतीय कामगारांची भरती करणाऱ्या कर्नाटक एम्टा कंपनीविरोधात आंदोलन छेडणारे

| December 21, 2013 03:33 am

दीडशे मराठी कामगारांना कमी करून ३५० परप्रांतीय कामगारांची भरती करणाऱ्या कर्नाटक एम्टा कंपनीविरोधात आंदोलन छेडणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत कामगार सेनेचे अध्यक्ष प्रमोद मोहोड यांना वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे यांनी बेदम मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, मोहोड यांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, तर ५० महिला व १०० पुरुष कामगारांना भद्रावती पोलिसांनी अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर केले असता त्यांनी जमानत घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
भद्रावती तालुक्यातील बरांज येथे कर्नाटक एम्टा कंपनीची कोळसा खाण आहे. एम्टा कंपनीने काही दिवसांपूर्वी तीन कामगारांची पश्चिम बंगाल येथे बदली केली. त्यानंतर तब्बल ४७ कामगारांना तडकाफडकी निलंबित केले. या कंपनीत एकूण ४०० कामगार आहेत. दरम्यानच्या काळात कर्नाटक एम्टाच्या वतीने स्थानिक मराठी कामगार व प्रकल्पग्रस्तांना घरचा रस्ता दाखवून बिहार व उत्तर प्रदेशातून ३५० कामगारांची आयात केली, तर मराठी कामगारांना हळूहळू कामावरून कमी केले. त्यानंतर ८४ कामगार कामावर जात असतानाही नोंदवहीवर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात नव्हत्या. त्यानंतर या सर्व कामगारांना आम्ही कामावरून काढून टाकल्याचे कर्नाटक एम्टा कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. परप्रांतीय कामगारांना अधिक पगारावर नोकरी देणाऱ्या एम्टा व्यवस्थापनाने मराठी कामगारांची एकप्रकारे गळचेपी सुरू केली. त्याचा विरोध म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थित कामगार सेनेचे अध्यक्ष प्रमोद मोहोड यांनी दीडशे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसह खाण परिसरात १७ डिसेंबरपासून आंदोलन सुरू असल्याने खाण पूर्णत: बंद झाली. तिकडे खाण पूर्ववत सुरू करण्यासाठी म्हणून एम्टा व्यवस्थापनाने परप्रांतीय कामगारांना खाणीत पाठवून काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्नही आंदोलनकर्त्यां कामगारांनी हाणून पाडाला. शेवटी काल एम्टा कंपनीने पोलिसांच्या मदतीने दीडशे आंदोलनकर्त्यांना कुटुंबीयांसह अटक करून भद्रावती पोलीस ठाण्यात आणल्याची माहिती मिळताच कामगार नेते मोहोड तेथे गेले.
कामगारांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याच्या मुद्दय़ावर भद्रावती पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे व प्रमोद मोहोड यांच्यात खडाजंगी झाली.
यावेळी ठाण्याबाहेर सर्व कामगार पोलीस दलाच्या निषेधाच्या घोषणा देत होते. त्याच वेळी एसडीपीओ गावडे यांनी मोहोड यांच्या कानफटात मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी मोहोड यांनी तुम्ही का मारहाण करत आहात, असे विचारल्यावरही त्यांचे काही न ऐकता गावडेंनी मोहोडांना पोलीस ठाण्याच्या आत खेचत आणून काठीने बेदम मारहाण केली. यात मोहोड यांचा डावा हात खांद्यापासून फ्रॅक्चर झाला. त्यानंतर पोलीस ठाण्यात कामगारांची नारेबाजी सुरूच होती.
या घटनेची माहिती राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांना मिळताच त्यांनी ही माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जाधव व जितेंद्र आव्हाड यांना दिली. शेवटी गंभीर जखमी अवस्थेत मोहोड यांनी बाहेर येऊन कामगारांना शांत केले. त्यानंतर परिस्थिती काहीशी निवळली. या सर्व दीडशे कामगार व महिलांना पोलिसी बळाचा वापर करून अटक केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पी.एम. परघणे, सहा.पोलीस निरीक्षक सुहास चौहाण, बिराजदार, वरोरा पोलीस ठाण्याचे कोळी या अधिकाऱ्यांसह पुरुष व महिला पोलिसांनी ही कारवाई केली.
गंभीर जखमी मोहोड यांची रात्री दहा वाजता भद्रावती ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर सलग आठ तास त्यांना ठाण्यातच डांबून ठेवण्यात आले. आज पहाटे चार वाजता त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मोहोड यांना रुग्णालयात आणणाऱ्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणखी थोडा उशीर झाला असता तर रुग्णाची प्रकृती अधिक गंभीर झाली असती, हे निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, हा सर्व प्रकार एम्टाच्या निर्देशावरून झाला असल्याचा आरोप मोहोड यांनी पत्रकारांशी बोलतांना केला, तर कामगारांच्या आंदोलनामुळे कंपनीचे आतापर्यंत आठ कोटींचे नुकसान झाल्याचा दावा एम्टाचे सिंग यांनी केला. काही कामगार नेते कामगारांना भडकवत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, अटकेतील कामगारांना आज न्यायालयात हजर केले असता जामीन घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे या सर्व कामगारांची जिल्ह्य़ातील सहा वेगवेगळ्या ठाण्यांत रवानगी करण्यात आली.
भद्रावती पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या महिलांना रात्री जेवण दिले नाही, तसेच आज सकाळी शौचासही जाऊ दिले नाही. पिण्यासाठी पाणी, चहा, नाश्ता व जेवणही घेऊ दिले नसल्याचा आरोप मोहोड यांनी केला, तर पोलीस अधिकारी कुणाला मारहाण करू शकत नाही. या मारहाणीची संपूर्ण चित्रफित आपल्याकडे उपलब्ध आहे. यात आपण पोलिसांना शिवीगाळ किंवा मारहाणही केली नसल्याचा दावा मोहोड यांनी केला.
होय मी मारहाण केली -गावडे   
कामगार नेते प्रमोद मोहोड यांना मारहाण केल्याचे उपविभागीय अधिकारी गणेश गावडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना मान्य केले. कामगारांच्या आंदोलनामुळे परिस्थिती हाताबाहेर जात होती तेव्हा कामगारांना अटक करून भद्रावती पोलीस ठाण्यात आणले. यावेळी बळाचा वापर केला. सर्वप्रथम आपणच मोहोड यांना मारहाण केल्याची कबुली गावडे यांनी दिली.
गावडेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आबांचे निर्देश  
न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या मराठी कामगारांना, तसेच त्यांच्या नेत्याला मारहाण करणारे वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या आबांनी आज पोलीस अधीक्षक राजीव जैन यांना नागपुरात बोलावून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. कोणत्याही व्यक्तीला मारहाण करण्याचे अधिकार पोलिसांना कुणी दिले, असा सवाल त्यांनी विचारला. या प्रकरणाची चौकशी जिल्ह्य़ाबाहेरील अधिकाऱ्यांकडून करावी, असे निर्देश देतानाच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या कामगारांच्या प्रश्नावर बैठक घेऊन तोडगा काढावा, अशा सूचना दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 3:33 am

Web Title: police officer beats up nationalist workers sena president
Next Stories
1 आदिवासी बांधवांचा विकास केवळ लोकशाहीतच – राज्यपाल
2 वाशिम जि. प. निवडणुकीत राज फॅक्टर
3 आमदारांच्या आंदोलनाने विधिमंडळ परिसर दणाणला
Just Now!
X