चंदनचोरीच्या उद्देशाने शहरातील सुभेदारी विश्रामगृहाच्या परिसरात बोलेरो गाडीने आलेल्या चोरांनी सहायक पोलीस निरीक्षक एन. एस. जाधव यांच्या अंगावर गाडी घातली. या हल्ल्यात जाधव यांच्या पायाला जबर मार लागला. या प्रकारानंतर पोलिसांनी पाठलाग करून सातजणांना अटक केली. पहाटे तीन-सव्वातीनच्या दरम्यान हे थरारनाटय़ घडले. तिघे पळून जाण्यात यश आले. सिटी चौक पोलीस ठाण्यात नऊजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हडको येथील टीव्ही सेंटर चौकाजवळ बोलेरो गाडीतून काही चोरटे चंदनचोरीसाठी अथवा दरोडय़ाच्या उद्देशाने आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बोलेरो (एमएच ४५ ए ७६३३) गाडीतून चोरटे जात असल्याचे लक्षात येताच सहायक पोलीस निरीक्षक एन. एस. जाधव यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. गाडीचा चालकाने जाधव यांच्या दिशेने गाडी वळवली आणि त्यांना धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या उजव्या पायास जबर मार लागला. पोलीस निरीक्षक हनुमंत पांचाळ आणि अन्य सहकाऱ्यांनी या गाडीचा पाठलाग करून सातजणांना पकडले.
गणेश अरुण राऊत (वय २२), समीर लालबेग मोगल (वय ३०), दत्तात्रय गजेंद्र जमदाडे (वय २३), नवनाथ तुकाराम क्षीरसागर (वय १९), तानाजी भोजलिंग चोपडे (वय २५), बालाजी चौरे (वय २०) रोहित पाटील, संदीप बाळू काशीद (वय २१), अतुल माणिक जाधव (वय २४) हे आरोपी सोलापूर व सांगली जिल्हय़ांतील आहेत. आरोपींकडून तीन करवती व कुऱ्हाडी जप्त करण्यात आल्या. तानाजी चोपडे, बालाजी चौरे, रोहित पाटील हे तिघे फरारी झाले. पोलीस निरीक्षक हनमंत पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दरोडय़ाचा गुन्हा नोंदविला.