पोलीस पाटीलपदाच्या रविवारच्या परीक्षेचा पेपर फु टल्याची व गैरप्रकाराची गंभीर तक्रार झाल्यानंतर परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच जिल्हाधिकाऱ्यांनी ही परीक्षा रद्द केल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. परीक्षा न देताच उमेदवारांना आपल्या गावी परतावे लागले. निवड प्रक्रियेतील या अनागोंदी व गैरकारभारामुळे येथील उपविभागीय महसूल कार्यालयातील प्रशासकीय कार्यक्षमता व कार्यपध्दतीवर   संशय    निर्माण   झाला आहे.
पेपरफु ट व गोंधळाची आयुक्त स्तरावरून सखोल चौकशी करून या प्रकारास जबाबदार असणारे दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांनी राज्य शासनाकडे केली आहे.
बुलढाणा महसूल उपविभागातील बुलढाणा, चिखली व देऊळगावराजा तालुक्यातील ५२ गावातील पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात २८ पदे भरण्यासाठी उपविभागीय महसूल कार्यालयातर्फे येथील जिजामाता महाविद्यालयात रविवारी, १३ जानेवारी रोजी निवड चाचणी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेला २६० उमेदवार उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष दूतामार्फत आलेल्या विशेष आदेशान्वये परीक्षा रद्द करण्यात आली. या परीक्षेचा पेपर फ ोडण्यात आला. त्यासाठी ४० हजारांपासून १ लाख रुपयांपर्यंत   सौदेबाजीसह लाच देण्यात आली.
पोलीस पाटील भरतीसाठी २ लाखांपासून ५ लाखांपर्यंत लाच देऊन ही भरती मॅनेज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी उपविभागीय कार्यालयातील एका लघुलेखकासह एक रॅकेटच कार्यरत असल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांना या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने त्यांनी परीक्षेचा पेपर रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा आदेश दिला आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रशासकीय कार्यपध्दती ढासळल्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी आहेत. अशा अनेक तक्रारी बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार विजयराज शिंदे यांनी राज्याचे महसूल मंत्री, राज्यमंत्री व सचिवांकडे केल्या आहेत. पोलीस पाटील पदाच्या निवड चाचणी परीक्षेतील रविवारच्या गोंधळामुळे या कार्यालयाच्या प्रशासकीय कार्यक्षमतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
उपविभागीय कार्यालय हे तेथे असलेला एक वादग्रस्त, वारंवार निलंबित होऊन पुन्हा पुन्हा पुर्नस्थापित व तेथेच ठाण मांडून बसलेला एक लघूलेखकच चालवितो, अशी चर्चा आहे. त्याच्या सौजन्यानेच हे गैरप्रकार होत असल्याचा  आरोपही उमेदवारांनी केला आहे.
या संदर्भात परीक्षेच्या पेपरमध्ये चुका व गोंधळ असल्याचा खुलासा उपविभागीय अधिकारी बिहाडे यांनी केला आहे, तर पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून काढून घेऊन दुसऱ्या सक्षम अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी दर्जाच्या स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
हे   प्रकरण    उपविभागीय   अधिकारी व परीक्षा    यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवर चांगलेच शेकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.