बांदीवाढोणा जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर धाड टाकून पोलिसांनी १३ जणांना अटक केली. या कारवाईत ४ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक डी.एम. बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ४० पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. या कारवाईमुळे कोंबड बाजार शौकिनांचे धाबे दणाण्ले आहे.
झरी तालुक्यातील मुकुटबन पोलीस ठाण्यांतर्गत बंदीवाढोणा येथील जंगलात छुप्या पद्धतीने कोंबड बाजार सुरू होता.
पोलिसांनी छापा टाकून झंडीमुंडी खेळणारे व अवैध दारू विक्री करणाऱ्यांसह १३ जणांना अटक केली. या वेळी ११ मोटारसायकलसह ४ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे मुकुटबन पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक डी.एम. बावीस्कर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस. बहसरे, राहुल किटे, अनुप वाकडे व महिला उपनिरीक्षक शिल्पा निमकर व पोलीस मुख्यालयातील २० व पुसद शहर पोलीस ठाण्यातील २० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा २ पोलीस व्हॅनमध्ये दुपारी ४ वाजता २ पोलीस व्हॅनमध्ये मुकुटबन ठाण्यापर्यंत बंदीवाढोणा गावालगत असलेल्या जंगलात पोहोचला.
पोलिसांचा छापा पडल्याचे लक्षात येताच काहींनी जंगलातून धूम ठोकली. पोलिसांनी १३ जणांना अटक करून त्यांच्याकडून ११ मोटारसायकल किंमत 3 लाख ८५ हजार, ५ नग मोबाईल किंमत ९ हजार ८०० रुपये, रोख ६ हजार ८०० रुपये व दोन मृत कोंबडे किंमत १ हजार रुपये असा एकूण ४ लाख ३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
कोंबड बाजारातून अटक करण्यात आलेल्यांमध्ये वासुदेव मडावी (रा. वाढोणाबाजार), विठ्ठल चामाटे (रा. मांगली), गणपत सोनटक्के (रा. वीरकुंड), रामचंद्र चिकराम (रा. दरारा), दादाराव मडावी (रा. सुर्ला), गणेश बावने (रा. बंदीवाढोणा), प्रवीण पेंदोर (रा. सुर्ला), सुनील जाधव (रा. वागदा), अशोक धोपटे (रा. सुर्ला), गणपत गोडे (रा. वणी ) यांचा समावेश आहे. जंगल भागात कोंबडबाजार व अवैध व्यवसाय सुरू असल्याने पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशाची ठाणेदारांकडून पायमल्ली होताना दिसून येते.