*    तीन नवीन पोलीस ठाणे
*    ४५६ पदांची निर्मिती
*    सीसी टीव्ही कॅमेरे व रोबोट यंत्रणा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिक शहर सीसी टीव्हीच्या नियंत्रणाखाली येणार असून मुंबईच्या धर्तीवर ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्यासाठी ५१ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. शहराच्या सुरक्षिततेच्या कामात ‘रोबोट’ची मदत घेण्याचा विचार केला जात आहे. तसेच साधारणत: ३०० लोकसंख्येमागे एक पोलीस या निकषानुसार अतिरिक्त ४५६ पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपलब्धता आणि शहरातील पोलीस ठाण्यांचे विभाजन करून तीन नवीन पोलीस ठाणे निर्माण केली जाणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पोलीस यंत्रणेच्या सज्जतेविषयी आ. जयंत जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिली. शहरात सीसी टीव्ही बसविण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपासून पडून आहे. लष्करी व महत्वपूर्ण औद्योगिक आस्थापनांमुळे नाशिक हे दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे आधीच उघड झाले आहे. रखडलेल्या प्रस्तावांची यादी आ. जाधव यांनी निदर्शनास आणून दिल्यावर या विषयावर चर्चा झाली.
शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना अत्यल्प मनुष्यबळामुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडत आहे. सद्यस्थितीत हजार लोकसंख्येमागे एक पोलीस कार्यरत आहे. पोलीस आयुक्तांनी शहरातील पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नवीन पोलीस ठाणे तसेच पदांच्या निर्मितीबाबत पाठविलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची मागणी जाधव यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या धर्तीवर सीसी टीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित केली जाणार असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. सध्या शासनाने दोन कोटीचा निधी दिला असला तरी एकूण ५१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.
सिंहस्थापूर्वी ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, तीन नवीन पोलीस ठाणे निर्माण करून विविध संवर्गातील ३१७ पदे निर्माण केले जातील. पोलीस दल आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच शहराच्या सुरक्षिततेसाठी रोबोट खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. या व्यतिरिक्त वाहतूक शाखेसाठी ७५, अंतर्गत सुरक्षा कक्ष ५, परदेशी नागरिकांची नोंदणी शाखा २, नवीन दहशतवादविरोधी कक्ष ११, नक्षलविरोधी कक्ष ११, आर्थिक गुन्हे शाखा १५, सायबर गुन्हे शाखा १३, फरारी आरोपी कक्ष ७ अशी विविध विभागांसाठी १३९ अतिरिक्त पदे निर्माण करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.
कुंभमेळ्यात सर्वोच्च सुरक्षितता राखण्यासाठी शासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. राज्याचे पोलीस महासंचालकही त्यात लक्ष ठेऊन आहेत. सिंहस्थ कुंभमेळा काळात राज्यभरातून पोलिसांचा जादा बंदोबस्तही उपलब्ध करून दिला जाईल. सध्या नाशिक व तासगाव येथील प्रशिक्षण संस्थेत १५९४ पोलीस उपनिरीक्षकांचे मूलभूत प्रशिक्षण सुरू असून ते झाल्यावर नाशिकची रिक्त पदे प्राधान्याने भरली जातील, असेही पाटील यांनी सांगितले.