निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर २३ गावगुंडांना तडीपार करण्यात आले आहे. एक हजाराहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संरक्षणासाठी दिलेल्या शस्त्रांचा गैरवापर होऊ नये, यासाठी ही शस्त्रे पोलीस आयुक्तालयात जमा करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. आतापर्यंत ४०० हून अधिक परवानाधारकांनी त्यांची शस्त्रे जमा केली आहेत.
शहरात निवडणूक प्रचाराचा जोरदार धडका सुरू आहे. मतदानाला अवघे काही दिवस बाकी असल्याने प्रत्यक्ष गाठीभेटींवर जोर आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी वाशीत एका वाहनातून ११ लाखांची बेहिशेबी रोकड पोलिसांनी जप्त केली होती. यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. याच बरोबर गावगुंडांकडून निवडणुकीच्या काळात कोणताही उपद्रव होऊ नये, यासाठी पोलिसांनी गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या २३ जणांना पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार केले आहे. त्याचप्रमाणे १८१८ जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. याच प्रमाणे शहरात सुमारे १३०० जणांकडे शस्त्रपरवाने आहेत. शस्त्रपरवान्यात सर्वाधिक भरणा हा राजकीय पुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते, बांधकाम व्यवसायिकांचा आहे.
या परवान्यामुळे अनेकांच्या कंबरेची शोभा वाढविणारे पिस्तूल हे स्टेटस्चे मानले जात आहे. सरंक्षणासाठी दिलेल्या या शस्त्रांचा निवडणुकीमध्ये दुरुपयोग होऊ नये, याकरिता निवडणूक आचारसंहिता लागताच शस्त्र आयुक्तालयात जमा करण्याचे आदेश परवानाधारकांना करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४३१ हून अधिक परवानाधारकांनी त्यांची शस्त्रे जमा केली आहेत.