आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पारंपरिक शाही मार्गावरील धोके लक्षात घेऊन ज्या पर्यायी मार्गावर साधु-महंत व पालकमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले होते, त्या नव्या शाही मार्गावर पोलीस यंत्रणेच्या अहवालानंतर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. या पर्यायी मार्गावरील समस्यांवर बोट ठेवत या समस्या दुर्घटनेला निमंत्रण देणाऱ्या ठरू शकतात, याकडे अहवालाद्वारे लक्ष वेधल्यानंतर पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनात शीतयुद्ध सुरू झाले आहे. या अनुषंगाने उपस्थित प्रश्नावर गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांनी देखील ‘तळ्यात-मळ्यात’भूमिका घेत सर्व विभागांमध्ये समन्वय असल्याची सारवासारव केली.
पोलीस यंत्रणेसह सर्व विभागांना घेतलेला निर्णय पाळावा लागेल, असे स्पष्ट करताना दुसरीकडे पर्यायी शाही मार्गावर पोलीस यंत्रणेचे मतही महत्त्वाचे असून, त्यावर विचार केला जाईल असे नमूद केले. जिल्हा प्रशासनाने पारंपरिक असो वा पर्यायी शाही मार्ग असो, दोन्ही ठिकाणी धोके असून त्यात कमी धोकादायक मार्गाची निवड करावयाची आहे. तिसऱ्या मार्गाचा प्रस्ताव सादर झाल्यास त्यावरही विचार करून एकत्रितपणे निर्णय घेता येईल असे म्हटले आहे. या एकूणच घडामोडींमुळे खुद्द पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घाईघाईत जाहीर केलेला निर्णयही वस्त्रांतरगृहाप्रमाणे मागे घेण्याची वेळ येऊ शकते, अशी चिन्हे दिसत आहेत.
त्र्यंबकेश्वरमधील सिंहस्थ कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सकाळी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी विलास पाटील, उपजिल्हाधिकारी महेश पाटील आदी उपस्थित होते. शुक्रवारी राज्यपाल नाशिक दौऱ्यावर असल्याने प्रशासन त्या नियोजनात गर्क आहे. यामुळे ही आढावा बैठक आटोपती घेण्यात आली. सविस्तर आढावा घेण्यासाठी लवकरच त्र्यंबकेश्वर येथे बैठक घेतली जाईल असे शिंदे यांनी सूचित केले. माध्यमांपुढे भूमिका मांडताना त्यांनी संभ्रमात अधिकच भर टाकली. मागील सिंहस्थातील पारंपरिक जुन्या शाही मार्गावर चेंगराचेंगरीची दुर्घटना होऊन भाविकांना प्राण गमवावे लागले होते. संपूर्ण राज्याचा हा उत्सव असल्याने आगामी कुंभमेळ्यात कोणतीही अनूचित घटना घडू नये, म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.
त्या अनुषंगाने पर्यायी शाही मार्गाचा निर्णय घेण्यात आला. सर्व यंत्रणांना विश्वासात घेऊन घेतलेल्या निर्णयाचे सर्व विभागांना पालन करावे लागेल. सिंहस्थाचे नियोजन करताना प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे कोणालाही आपली जबाबदारी झटकता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यायी शाही मार्गाच्या मुद्दय़ावरून पोलीस व जिल्हा प्रशासन यांच्यात कोणतेही वाद नाहीत. या मार्गाबाबत पोलीस यंत्रणेने व्यक्त केलेले मत विचारात घ्यावे लागेल. सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. कोणाच्या सूचना आल्यास बैठकीत त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे नमूद केले. गृह राज्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने पर्यायी शाही मार्गाचे भवितव्य दोलायमान असल्याचे दिसत आहे.
त्र्यंबकेश्वर येथे शैव-वैष्णव साधूंमध्ये मान-अपमानावरून प्रत्येक सिंहस्थात वाद होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. असे वाद आगामी सिंहस्थात होऊ नयेत म्हणून पोलीस यंत्रणा काळजी घेणार आहे. प्रत्येक आखाडय़ाची जबाबदारी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यावर सोपविली जाईल. या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न उद्भवू नयेत म्हणून आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्र्यंबकेश्वर येथे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सिंहस्थ कामांसाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे शिंदे यांनी नमूद केले.

कमी धोकादायक मार्गाचा विचार
मागील सिंहस्थात पारंपरिक जुन्या शाही मार्गावर चेंगराचेंगरीची दुर्घटना झाल्यावर रमणी आयोगाने पर्यायी मार्ग निवडण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने पर्यायी मार्गावर विचार झाला. पारंपरिक मार्गाचा विस्तार करणे हा पर्याय होता. तथापि, त्या ठिकाणी १०० वर्षांपूर्वीचे वाडे आणि जुनी घरे असल्याने ती हटविणे अवघड होते. या शिवाय, त्या मार्गावरील तीव्र उतार कमी करणे अशक्य होते. यामुळे पारंपरिक मार्गाऐवजी पर्यायी मार्गावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्या अंतर्गत पर्यायी नवा मार्ग निश्चित झाला. पारंपरिक आणि पर्यायी या दोन्ही मार्गाचा अभ्यास करण्यात आला. दोन्ही मार्गावर धोके आहेत. त्यात कोणत्या मार्गावर कमी धोका आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. पर्यायी मार्गावर पोलीस यंत्रणेने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. संबंधितांनी तिसरा पर्यायी मार्ग सुचविल्यास, प्रस्ताव दिल्यास त्यावरही विचारविनिमय करता येईल. अद्याप वेळ असून उपरोक्त पर्यायांवर साधु-महंत व इतर यंत्रणांना विश्वासात घेता येईल.
– विलास पाटील (जिल्हाधिकारी)