अरे, तू कोण आम्हांला बाजूला हो म्हणणारा..वर्दीची मस्ती आली काय..आज जाऊ देऊ त्याला, कोणत्या पोलीस ठाण्यात आहे ते नंतर पाहून घेऊ..
राजकीय पक्षांच्या मग्रुरीचा आणि त्या मग्रुरीला त्यांच्याच भाषेत उत्तर देणारे पोलीस, अशी जुगलबंदी बुधवारी सकाळी पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालय मतदान केंद्रावर मतदारांना पाहावयास मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या नाशिक पूर्व मतदारसंघातील हे मतदार केंद्र तसे कायम शांत असते. मध्यमवर्गीय आणि काही प्रमाणात झोपडपट्टीचे मतदार असलेल्या या केंद्रात सकाळपासून शांततेत मतदान सुरू असताना राजकीय पक्षांच्या काही कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीमुळे शांतता भंग पावली. मतदान केंद्राच्या प्रवेशव्दाराजवळ गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांना एका पोलिसाने बाजूला उभे राहण्यास बजावल्यावर एका कार्यकर्त्यांने बाजूला न होता पोलिसाशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. त्यावर पोलिसाने आपण आपली डय़ुटी बजावत असल्याचे सांगितले. तरीही कार्यकर्त्यांचा आवाज वाढतच गेला. ते पाहून मग पोलिसानेही त्याच आवाजात उत्तर देण्यास सुरूवात केली. पोलिसाचा आवाज वाढल्यावर कार्यकर्ता थोडा नरमला. एकाने कोणाशीतरी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते पाहून पोलिसानेही कोणाला बोलवायचे असेल तर बोलवूनच घ्या, अशी आव्हानात्मक भाषा वापरली.
आपल्या कोणत्याच क्लुप्तीचा पोलिसावर काहीच प्रभाव पडत नसल्याचे लक्षात आल्यावर कार्यकर्ते एका कोपऱ्यात जमले. पोलिसाला वर्दीची मस्ती आली असून तो कोणत्या पोलीस ठाण्यातील आहे ते नंतर पाहून घेऊ, असे त्यांचे बोलणे सुरू झाले. तेवढय़ात एकाने त्यांना पंचवटी पोलीस ठाण्याचा कर्मचारी असल्याची माहिती दिली. केंद्राच्या बाहेर रेंगाळत ते कार्यकर्ते मग आपआपसातच पोलिसांच्या कार्यशैलीवर तोंडसुख घेऊ लागले.
दुसरीकडे, पोलिसांच्या बंदोबस्तावर मतदार मात्र समाधानी होते. ज्यांना चालणे मुश्किल आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांना कोणी दुचाकीवरून घेऊन आल्यास त्यास थेट आतपर्यंत दुचाकी नेण्यास मुभा दिली जात होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरीकही खूष होते. जुन्या नाशिकमधील मनपा शाळा क्र. ३५ आणि क्र. ३९ या मतदान केंद्राभोवतीही पोलीस कार्यकर्त्यांना रेंगाळू देत नव्हते. गटा-गटाने युवक रस्त्यावर उभे असल्याचे दिसताच पोलीस त्यांना हुसकावून लावत होते. त्यामुळे मतदान केंद्राबाहेरील अनावश्यक गर्दी दूर होऊन मतदारांना केंद्रापर्यंत अगदी सहजगत्या पोहोचता येत होते. एरवी हे शक्य होत नव्हते, अशी प्रतिक्रिया काही मतदारांनी व्यक्त केली.
दुपारपर्यत मतदान अतिशय संथपणे सुरू होते. त्यामुळे पोलिसांना विशेष असे कष्ट घ्यावे लागले नाहीत. पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून होणारा त्रास कमी झाल्याची प्रतिक्रिया उमटत होती.
पोलीस कर्मचारी अनोळखी असल्याने कार्यकर्ते शांत
नाशिक मध्य मतदारसंघातील जुने नाशिक परिसर हा संवेदनशील मानला जातो. या भागातील रंगारवाडा विद्यामंदिर, बडी दर्गा उर्दू शाळा, कथडा भागातील वावरे विद्यामंदिर, सारडा सर्कलवरील नॅशनल उर्दू हायस्कूल या मतदान केंद्राभोवती पोलिसांचा विशेष बंदोबस्त होता. दुपारी एक वाजेपर्यंत या सर्व ठिकाणी किरकोळ अपवाद वगळता मतदान अगदीच शांततेत सुरू होते. रस्त्यांवर टोळक्याने उभ्या राहणाऱ्या कार्यकर्त्यांना खासगी वाहनांमधून अचानक येणारे अतिरिक्त पोलीस दल पिटाळून लावत होते. बहुसंख्य पोलीस कर्मचारी आणि अधिकारी नवीन असल्याने कार्यकर्त्यांची अधिकच अडचण झाली. तीच गोष्ट पोलिसांसाठी फायद्याची झाली. कोणालाच ओळखत नसल्याने समोर उभा असलेला कार्यकर्ता कोणत्या नेत्याचा आहे, याचे कोणतेही दडपण न येता पोलिसांना आपली लाठी फिरवता येत होती. कार्यकर्त्यांची त्यामुळे त्वरीत पांगापांग होत होती. नॅशनल उर्दू हायस्कुलच्या मतदान केंद्राभोवती बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांनीही नव्याने नेमलेल्या कर्मचाऱ्यांमुळे चांगलाच फायदा झाल्याचे मान्य केले.