एखाद्या सर्वसामान्य नागरिकाच्या नो पार्किंग क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या गाडीला ओढत पोलीस चौकीपर्यंत नेणाऱ्या वाहतूक पोलिसांना सध्या ठाणे-बेलापूर मार्गावर अनधिकृतरीत्या उभ्या राहणाऱ्या तीनशे ते चारशे गाडय़ा दिसत नसून पालिकेने दोनशे कोटी रुपये खर्च करून पुनर्बाधणी केलेला हा रस्ता सध्या रिलायन्ससारख्या कंपन्यांना आंदण दिल्याचे चित्र आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील जुन्या नोसिल, पील, स्टॅण्डर्ड, फिलिफ्स, कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळल्यानंतर त्या जागा आता रिलायन्स, रहेजासारख्या मोठय़ा कंपन्यांनी घेतलेल्या आहेत. या कंपन्यांनी या ठिकाणी आयटी कंपन्यांना सुरू केल्या असल्याने येथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. यात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कार कंत्राटी पद्धतीने दिलेली आहेत. एकटय़ा मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीत ४०० ते ५०० कंत्राटी गाडय़ा आहेत. ही सर्व वाहने यात मोठय़ा बसेसचाही सहभाग असून ती सध्या ठाणे-बेलापूर मार्गावरील एका मार्गिकमध्ये उभी राहात आहेत. त्यामुळे नवी मुंबई पालिकेने येथील वाहतूक कोंडीचा विचार करून सहा पदरी बांधलेल्या ठाणे-बेलापूर मार्गाची एक मार्गिका या वाहनचालकांनी गिळंकृत केल्याचे दृश्य आहे. त्यामुळे या मार्गावर सकाळ- संध्याकाळ वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. घणसोली नाक्यापासून सुरू होणारी रांग थेट घणसोली रेल्वे स्थानकापर्यंत येऊन भिडत आहे. नो पार्किंग क्षेत्रात उभी राहणारी एखाद्या सर्वसामान्य नागरिकाची गाडी फरफरटत पोलीस चौकीपर्यंत किंवा चाकांना लॉक लावून ठेवणारे वाहतूक पोलिसांना गेली एक माहिना लागणारी ही भलीमोठी रांग दिसत नाही का, असा सवाल या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना पडला आहे. यात काही वाहतूक पोलिसांबरोबर येथील वाहन कंत्राटदारांनी साटेलोटे बांधल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रिलायन्समध्ये मोठय़ा प्रमाणात नवीन बांधकाम सुरू असल्याने कंत्राटदाराची ही वाहने बाहेर काढण्यात आल्याचे समजते. त्यामुळे ही सर्व वाहने या रस्त्यावर उभी आहेत. बांधकाम करताना किंवा इतर वेळी या कंपन्यांनी आपल्या वाहनांची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. रिलायन्सच्या खूप मोठय़ा प्रमाणात गाडय़ा रस्त्यावर आल्याने हा विषय चर्चेला आला आहे. पण त्यापूर्वी सीमेन्स, भारत बिजली, रहेजा यासारख्या कंपन्यांचे कंत्राटदाराच्या बस, छोटय़ा गाडय़ा ठाणे-बेलापूर मार्गावर ठाण मांडून आहेत. वाशी येथे अशा प्रकारे उभ्या राहणाऱ्या गाडय़ावर पालिका कारवाई करीत असल्याचे दिसून येते पण तीच तत्परता या वाहनांवरील कारवाईसाठी नसल्याचे स्पष्ट आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर अशा प्रकारे वाहने उभी राहत असल्याची तक्रार आली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चार दिवसांपूर्वी अशी कारवाई करण्यात आली आहे. पण पुन्हा अशी वाहने उभी रहात असतील तर दंडात्मक कारवाई सतत करण्याचे आदेश दिले जातील असे उपायुक्त (वाहतूक) विजय पाटील यांनी सांगितले.