राहुरी पोलीस ठाण्याचे विभाजन करून देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे करण्यास गृहविभागाने मंजुरी दिली आहे. लवकरच हे पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक रावसाहेब िशदे यांनी दिली.
देवळाली प्रवरा पोलीस ठाण्यासाठी एक पोलीस निरीक्षक, दहा पोलीस कर्मचारी व एक मोटार देण्यात येणार आहे. भविष्यात गरजेनुसार कर्मचारी संख्या वाढविण्यात येणार आहे. नियोजित पोलीस ठाण्यासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे प्रयत्न केले होते. त्याला आता यश आले आहे. नव्या पोलीस ठाण्यासाठी २२ गुंठे जागा उपलब्ध करण्यात आली आहे. इमारतीचे भूमिपूजन येत्या १५ दिवसांत होणार आहे. अधीक्षक िशदे यांनी देवळाली प्रवरा येथे भेट दिली. त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी पोलीस ठाण्यासंदर्भात चर्चा केली. माजी आमदार कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष गोरक्षनाथ मुसमाडे, अजिज शेख, मच्छिंद्र कदम, बाबासाहेब कदम, बाजीराव चव्हाण, पोलीस उपाधीक्षक अंबादास गांगुर्डे, निरीक्षक अशोक रजपूत आदी उपस्थित होते.