न्हावा-शेवा पोलीस ठाण्याची नव्याने उभारणी केली जात असून जेएनपीटी कडून उभारण्यात येणाऱ्या या नव्या पोलीस ठाण्यासाठी सोनारी येथील देण्यात आलेल्या जागेऐवजी इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जेएनपीटी विश्वस्त मंडळाकडे प्रस्ताव देण्यात येईल, असे आश्वासन मंगळवारी जेएनपीटीचे मुख्य सचिव शिबैन कौल यांनी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
पोलिसांच्या मागणीनुसार नव्या पोलीस ठाण्याचा प्रस्ताव तयार करून तो जेएनपीटीकडे देण्यात आलेला होता. त्यानुसार जेएनपीटी व्यवस्थापनाने पोलीस ठाण्याच्या उभारणीला विश्वस्त मंडळात मंजुरी देऊन पोलीस ठाण्याच्या उभारणीची निविदा काढली आहे. मात्र त्यामुळे सोनारी ग्रामस्थांना त्यांचे मैदान गमवावे लागणार असल्याने सोनारी ग्रामस्थांच्या मैदानाच्या जागेऐवजी इतरत्र पोलीस ठाणे उभारण्याची मागणी सोनारीचे सरपंच महेश कडू यांनी केली आहे. यावेळी समितीचे निमंत्रक अतुल दिनकर पाटील, आमदार विवेक पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त भूषण पाटील, गोपाळ पाटील, सुरेश पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारीही उपस्थित होते.